लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गुंड दाऊद आणि बंडू आंदेकरची ओळख असल्याचे सांगत सदाशिव पेठेतील बांधकाम व्यावसायिकाला धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला. व्याजाने घेतलेले ३० लाख रुपये, त्याबदल्यात ४० लाखांचे व्याज घेऊनही आणखी ३० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार आहे.
एका ३५ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, शशिकांत महादेव गोलांडे (वय ७६), नीलेश सुरेश देशपांडे (वय ४७) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, संबंधित बांधकाम व्यावसायिकाने २०१० मध्ये बांधकाम सुरू केले. सन २०१३ मध्ये त्यांची ओळख ही बांधकाम साहित्य पुरवणारे आणि व्याजाने पैसे देणारे शशिकांत गोलांडे यांच्याशी झाली. यानंतर त्यांनी गोलांडे यांच्याकडून साहित्य घेण्यास सुरुवात केली. त्याचे पैसे ते वेळोवेळी देत होते. मात्र, २०१५ मध्ये फिर्यादीला पैशांची चणचण जाणवू लागली. याबाबत गोलांडे यांना समजले असता त्यांनी फिर्यादीला व्याजाने पैसे देण्याची तयारी दर्शवली.
फिर्यादींनी पैसे घेण्यास होकार दिला आणि ७ टक्के व्याजाने बांधकाम व्यवसायासाठी तीस लाख रुपये घेतले. महिन्याला त्याचे २ लाख १० हजार रुपयांचे व्याज ते देत. सन २०१८ पर्यंत त्यांनी गोलांडे याला चाळीस लाख रुपये व्याज दिले. कर्जाऊ घेतलेले तीस लाख रुपयांचे मुद्दलही त्यांनी परत केले. मात्र, शशिकांत गोलांडे त्यांच्याकडे आणखी तीस लाख रुपयांची मागणी करून फिर्यादींना सतत फोन करू लागले. तसेच नीलेश देशपांडे यांनी कार्यालयात बोलावून पिस्तुलाचा धाक दाखवत पैसे देण्याची धमकी दिली.
एकेदिवशी फिर्यादी घरी नसताना नीलेश देशपांडे व गोलांडे फिर्यादीच्या घरी गेले. फिर्यादीच्या आई-वडिलांना धमकावत त्यांनी मुलाला पैसे देण्यास सांगा, असे बजावले. गुंड दाऊद आणि बंडू आंदेकर यांच्याशी ओळख असल्याची भीती दाखवत आरोपींनी फिर्यादीला ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. खडक पोलीस अधिक तपास करत आहेत.