जुन्नर : आधार कार्ड सक्तीचे असावे की नसावे, आधारला जोडलेली माहिती गुप्त राहते की नाही यावर सर्वत्र चर्चाचर्वण सुरु असतानाच आधार कार्डचा एका नवदाम्पत्याने खुबीने वापर केला आहे. लग्नासाठी नवनवीन संकल्पना राबवित असतानाच आधार कार्डची लग्नपत्रिकाच या दाम्पत्याने तयार केली आहे. विशेष म्हणजे आधारवरील क्यूआर कोडचाही यामध्ये खुबीने वापर करण्यात आला आहे. भारतीय नागरिकाची ओळख म्हणून आधार कार्ड अस्तित्वात आले. आधारवरुन आजवर बरेच वादंग उठले. मात्र, आधार कार्डचा आधार घेऊन जुन्नर येथील नवदाम्पत्याने स्वत:च्या लग्नाची पत्रिका तयार केली आहे. येथील विद्या इंटरनॅशनल स्कूलमधील संगणक शिक्षक रविकिरण कुंभोजे-तसेच जुन्नरमधील कथ्थक शिक्षिका मयुरी यंदे या जोडप्याने ही संकल्पना अस्तित्वात आणली. या दोघांचा विवाह कोल्हापूर येथे होणार आहे. त्यासाठी आधार कार्डच्या संकल्पनेचा वापर करुन ही पत्रिका तयार करण्यात आली आहे. आधारवर ज्याठिकाणी नागरिकाचे छायाचित्र असते. त्याठिकाणी पती पत्नीचा फोटो छापण्यात आला आहे. तर कार्डवर दोघांचीही नावे देण्यात आली आहेत. नोंदणी क्रमांकाच्या जागी विवाहाची तारीख अतिशय खुबीने देण्यात आली आहे. विवाहस्थळ, विवाहमुहूर्तही सुटसुटीतपणे देण्यात आल्याने ही आधार पत्रिका अधिकच आकर्षक बनली आहे. आधार कार्डमध्ये जसा क्यू आर कोड असतो. त्याचप्रमाणे क्यूआर कोड देखील पत्रिकेमध्ये वापरण्यात आला आहे. या क्यू आर कोडला मोबाईलद्वारे स्कॅन केले असता या नवदांपत्याच्या प्री वेडींगचा व्हिडीओ दिसायला लागतो. ही वैशिष्ट्यपुर्ण संकल्पना घेऊन पत्रिका छापल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. तंत्रज्ञानाचा खुबीने वापर केलेल्या या लग्नपत्रिकेच्या वेगळेपणाची चर्चा होत आहे. ‘नात्यांसाठी नाती जुळती, हीच खरी संस्कृती’ असा संदेशही या पत्रिकेच्या माध्यमातून या नवदाम्पत्याने दिला आहे.