पुणे : महापालिकेच्या आराेग्य विभागातील वेगवेगळ्या विभागात पूर्वी मनुष्यबळाअभावी लिपिकांच्या कामांची जबाबदारी शिपाई व बिगारी यांना देण्यात आली होती. यानंतर महिनाभरात कंत्राटी तत्त्वावर नवीन लिपिकांची भरती केली. मात्र, लिपिकांची कामे करणारे शिपाई व बिगारी आता नव्याने भरती झालेल्या लिपिकांना काम करायला जागा देत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. या विराेधात एका ज्येष्ठ नागरिकाने थेट आराेग्य मंत्रालयाकडे तक्रार केली आहे.
एकीकडे पालिकेच्या दवाखान्यांत सेवकांची कमतरता आहे. सेवकांच्या मनुष्यबळाअभावी नागरिकांना वेळेवर आराेग्यसेवा मिळत नाही. दुसरीकडे मात्र आराेग्य विभागात राजकीय आशीर्वादाने अनेक सेवकांना आराेग्य विभागाच्या कार्यालयात त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यावेळी गरज हाेती ताेपर्यंत ठीक आहे. मात्र, आता नवीन भरती झाल्याने त्यांना जागा देणे आवश्यक असताना ती दिली जात नाही, अशी तक्रार ज्येष्ठ नागरिक रमेश खामकर यांनी प्रथम अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्याकडे केली. तसेच यानंतर त्यांनी आराेग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रार केली.
आराेग्य विभागात आराेग्य प्रमुख कार्यालय, शहरी गरीब, अन्न परवाना, पीसीपीएनडीटी, मेडिकल युनिट, वैद्यकीय परवाना, सीएचएस, जन्म-मृत्यू विभाग अशा विविध कार्यालयांमध्ये मनुष्यबळाअभावी पूर्वी ज्यांना लिखापडीचे किंवा संगणकीय ज्ञान हाेते, असे शिपाई, बिगारी या कर्मचाऱ्यांना लिपिकांचे काम देण्यात आले होते. मात्र, आता महापालिकेने ३ मार्चपासून १९ नवीन लिपिकांची भरती केली आहे. त्यांना ३ मार्चपासून कामावर रुजू करून घेतले आहे. त्यामुळे आधी त्या ठिकाणी काम करणारे व मूळचे शिपाई व बिगारी संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना दुसरीकडे काम देण्याऐवजी त्यांनाही तेथेच ठेवण्यात आले आहे.
ठाण मांडून बसलेले शिपाई, बिगारी हे नव्या लिपिकांना तेथे बसायला जागा देत नाहीत. तसेच त्यांना उपऱ्यासारखी वागणूक देत असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. त्यावर आराेग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी काेणताही निर्णय घेत नाहीत. तसेच हे कर्मचारी तेथे अनेक वर्ष असल्याने बहुतेकांना राजकीय वरदहस्त असल्याने ते ठाण मांडून बसल्याचे म्हटले जाते.