पुणे: गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवून सायबर फसवणुकीच्या अनेक तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या आहेत. बुधवारी (दि. १०) एकाच दिवसात ४ जणांना तब्बल ३५ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
- बाणेर परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय युवकाने चतुःशृंगी पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १ जुलै ते १० जुलै या दरम्यान घडली आहे. फिर्यादी यांना सायबर चोरट्याने शेअर मार्केटिंगमध्ये चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवून एका व्हाॅट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केले. त्यामध्ये दररोज शेअर मार्केटविषयी माहिती दिली जात होती. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे भासवले जात होते. गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्यांना ट्रेडिंग करण्यासाठी एक ॲप डाउनलोड करायला लावले. यात फिर्यादी यांनी १० दिवसांत तब्बल १४ लाख १५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. यानंतर त्यांच्या ॲपवर शेअर ट्रेडिंगमधून फायदा झाल्याचे दिसून येत होते. मात्र, फिर्यादी यांना ते पैसे काढता येत नव्हते. यावेळी त्यांनी सायबर चोरट्यांशी संपर्क केला, तेव्हा वेळोवेळी आणखी पैसे भरण्यासाठी तगादा लावला जात होता. पैसे मिळणार नाहीत, याची खात्री झाल्यावर पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
- बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या एका ४४ वर्षीय व्यक्तीने मार्केटयार्ड पोलिसांना फिर्याद दिली आहे. ट्रेडिंग केल्यास जास्त नफा मिळेल असे आमिष दाखवून १३ लाख ५१ हजार रुपये उकळले आहेत.
- गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. शेअर मार्केटमध्ये जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेकडून ५ लाख ९८ हजार रुपये उकळले आहेत.
- उंड्री भागात राहणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जास्त नफा मिळवण्यासाठी मोबाईलवर लिंक पाठवून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यास सांगितले. त्याद्वारे २ लाख १० हजार रुपये भरण्यास भाग पाडून फसवणूक केली आहे.