शेलपिंपळगाव : कोविडच्या काळात लॉकडाऊनचा गैरफायदा घेत खासगी व सहकारी दूध संघांकडून दूधउत्पादक शेतकऱ्यांची लूटमार करण्यात आली आहे. एकीकडे दुधाची मागणी घटल्याचे कारण देत दूध संघांनी दूध खरेदीचे दर १० ते १५ रुपये प्रतिलिटरने कमी केले. मात्र, ग्राहकांसाठीचे विक्री दर मात्र तसेच ठेवत दूधउत्पादक शेतकऱ्यांची व ग्राहकांची प्रचंड लूटमार केली आहे. याविरोधात किसान युवा मोर्चा संघटनेनी तीव्र आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. १७) खेड तालुका किसान युवा मोर्चा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दूध दरवाढी संदर्भातील, तसेच अन्य मागण्यांचे लेखी निवेदन नायब तहसीलदार राजेश कानसकर यांना दिले.
लॉकडाऊनच्या काळात दुधाची मागणी घटल्याचे कारण दाखवून ज्या खासगी सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर पाडले, अशा सर्व दूध संघांचे ऑडिट करा. प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती व त्याप्रमाणे किती दर कमी करण्यात आले, याबाबत सखोल चौकशी करण्याची गरज आहे. परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या खासगी व सहकारी दूध संघांवर कठोर कारवाई करा. तसेच केलेली लूटमार वसूल करून ती शेतकऱ्यांना परत करा. लॉकडाऊनपूर्वी मिळत असलेला प्रतिलिटर ३५ रुपये दर तातडीने सुरू करा.
आगामी काळात दूध उत्पादकांची लूटमार करता येणार नाही. यासाठी खासगी व सहकारी दूध संघांना लागू होईल, असा लूटमारविरोधी कायदा करावा. तसेच साखर व्यवसायप्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधार भावासाठी एफआरपी व शिल्लक मिळकतीत हक्काच्या वाट्यासाठी रेव्हेन्यू शेअरिंग असे कायदेशीर दुहेरी संरक्षण लागू करा, दूध भेसळ बंद करा, कायद्याची अंमलबजावणी करून ग्राहकांना शुद्ध दूध रास्त दरात उपलब्ध होईल, याची कायदेशीर हमी द्या, अशा विविध मागण्यांचे लेखी निवेदन किसान युवा क्रांती संघटनेचे खेड तालुकाध्यक्ष शहाजी निकम, सचिव माणिक साबळे, उपाध्यक्ष अनिल खलाटे, दत्ता दरगुडे, विकास भोसकर, रमेश गोकुळे, संतोष गोकुळे आदींनी नायब तहसीलदारांना दिले आहे.
राजगुरूनगर येथे दूध दरवाढी संदर्भातील निवेदन देताना किसान युवा मोर्चा संघटनेचे पदाधिकारी.