पुणे : महापालिकेच्या गुलटेकडी येथील व्हेईकल डेपोमध्ये जुन्या आणि नादुरुस्त असलेल्या वाहनांचे कोट्यवधी रुपयांचे भंगार पडून आहे. पालिकेकडून या साहित्याचा लिलाव केला जातो. परंतु, लिलाव होऊनही लॉकडाऊन असल्याने हे साहित्य हलविण्यात आलेले नाही. उघड्यावरच पडलेल्या या साहित्यामुळे मोठ्या प्रमाणावर डेपोची जागा व्यापली असून चालू स्थितीतील वाहने बाहेर उभी करावी लागत आहेत. यासोबतच याठिकाणी वारंवार होणाऱ्या चोऱ्यांची चौकशी केली जाण्याचीही आवश्यकता आहे.
महानगरपालिकेच्या सर्व प्रकारच्या वाहनांची देखभाल, नियोजन मोटर वाहन विभागामार्फत केले जाते. या गाड्यांचा डेपो गुलटेकडी येथील स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मध्ये आहे. डेपोमार्फत चालकांची कंत्राटी पद्धतीने सेवा घेतली जाते. व्हेईकल डेपो या ना त्या कारणाने कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. डेपोच्या कारभारावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. अनेकदा नगरसेवक आणि राजकीय पक्षांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी यापूर्वी केलेली आहे.
व्हेईकल डेपोमधील जुन्या गाड्या, स्क्रॅप करण्यात आलेल्या वाहनांचे अवयव असे कोट्यवधींचे भंगार पडून आहे. वाहन स्क्रॅप करण्यात आल्यानंतर त्याच्या नोंदी ठेवल्या जातात असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, आजवर लाखो रुपयांचे भंगार चोरीला गेलेले आहे. चोरीच्या तक्रारी अधून मधून केल्या जातात. अधिकऱ्यांकडून चोरट्या-भुरट्यांच्या नावावर चोरी खपविली जाते. परंतु, येथील भांगराच्या चोरीची चौकशी होणे आवश्यक असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या साहित्याच्या नोंदींमध्ये तफावत असल्याचे आणि जाणीवपूर्वक खोट्या नोंदी केल्या जात असल्याचा आरोप केला आहे. ----- व्हेईकल डेपोमधील जुन्या वापरात नसलेल्या, स्क्रॅप झालेल्या वाहनांसह त्यांच्या अवयवांचे भंगार मोठ्या प्रमाणावर पडून आहे. या मालाची वारंवार चोरी होते. डेपोमधील नोंदी, आजवर झालेल्या चोऱ्या याची चौकशी केली जावी. खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या तक्रारी केल्या जात असल्याची शक्यता आहे. लिलाव प्रक्रियेमध्येही लपवाछपवी होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे या व्यवहारांची चौकशी केली जावी. - एकनाथ ढोले, जिल्हा प्रमुख, महाराष्ट्र वाहतूक सेना ----- स्क्रॅप झालेली वाहने, वाहनांचे जुने सुटे अवयव आदी भंगाराची लिलावाद्वारे विक्री केली जाते. महिन्यापूर्वीच एक कोटी ८२ लाखांचा लिलाल झाला असून लॉकडाऊनमुळे माल नेता आलेला नाही. या सर्व साहित्याच्या नोंदी ठेवण्यात येतात. चोरीच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. तरीही हे साहित्य खुल्या जागेत असल्याने चोऱ्या होतात. - राजेंद्र शिपेकर, प्रभारी कार्यकारी अभियंता, मोटार वाहन विभाग