पुणे : कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणातील धक्कादायक खुलाशानंतर डॉ. अजय तावरे अधीक्षक असलेल्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत काम करणाऱ्या दोन महिला परिचारिकांची चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात आली. यात पोलिसांनी आणखी काही धागेदोरे हाती लागताहेत का? याबाबत चाैकशी केली.
या प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्यात डॉ. तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे आजवरच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच धर्तीवर ही चौकशी करण्यात आली.
कल्याणीनगर परिसरात बड्या बिल्डरच्या ‘बाळा’ने भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार दोघांना उडवले. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात बाळाला वाचवण्यासाठी बाळाच्या बापाने डॉ. अजय तावरे याला हाताशी धरून अल्पवयीन बाळाचे रक्त तपासणीसाठी न देता अन्य दुसऱ्याचे रक्त दिले होते. यामध्ये डॉ. तावरे, डॉ. हाळनोर आणि शिपाई घटकांबळे यांच्यात आर्थिक व्यवहार झाला होता. पोलिसांच्या तपासात हा धक्कादायक प्रकार उघड झाला होता.
ज्यावेळी सीटीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले त्यात नर्स असल्याचे दिसून आले. त्यामुळे या नर्सचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का?, याचा तपास केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर संबंधित परिचारकांचा बुधवारी (दि. ३०) गुन्हे शाखेच्या कार्यालयात जबाब नोंदविण्यात आला आहे.
गुरुवारी गुन्हे शाखेने ससून रुग्णालयात त्या विभागात कार्यरत असलेल्या दोन परिचारिकांना चौकशीसाठी बोलाविले हाेते. रक्ताचे नमुने घेतल्याच्या दिवशी नेमके काय झाले, कोण कोण ससून रुग्णालयात आले होते, नेमके त्या दिवशी कोणाचे रक्त काढण्यात आले. रक्ताचे नमुने कुठे टाकण्यात आले, याबाबतही परिचारिका महिलांची चौकशी करण्यात आली. या प्रकरणात गुन्हे शाखेकडून गुन्ह्याचा तपास केला जात असून गुन्ह्याची साखळी जुळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.