पुणे : कल्याणीनगर भागातील अपघात प्रकरणानंतर देशभरातून संताप व्यक्त होत असताना या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकासह सहायक निरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश शुक्रवारी रात्री पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
कल्याणीनगर भागात रविवारी (१९ मे) मध्यरात्री भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता अनिश अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांना धडक दिली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मुलगा अल्पवयीन असल्याने बाल न्याय मंडळाने १५ दिवस वाहतूक पोलिसांबरोबर काम करायचे, तसेच वाहतूक प्रश्नावर ३०० शब्दांचा निबंध लिहायचा, अशा अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दाद मागितली. दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बाल न्याय मंडळात त्याला पुन्हा हजर करण्यात आले. बाल न्याय मंडळाने त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. सामाजिक, तसेच राजकीय क्षेत्रातून दबाब वाढला होता. त्यानंतर येरवडा पोलिसांकडून अपघात प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे या प्रकरणाचा तपास करणार आहेत.