पुणे : पुण्यातील कुरकुंभ येथील कारखान्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज रॅकेट पुणे पोलिसांनी उघड केले होते. यावेळी ३ हजार ६७४ कोटी रुपयांचे तब्बल १ हजार ८३६ किलो मेफेड्रॉन जप्त केले होते. या गुन्ह्याची व्याप्ती आंतरराष्ट्रीय पातळीवरील असल्याने गुन्ह्याचा तपास आता पुणे पोलिसांकडून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) कडे वर्ग केला आहे. १० जून रोजी संपूर्ण तपास कागदपत्रांसह एनसीबीकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
याप्रकरणात वैभव ऊर्फ पिंट्या माने, अयज अमरनाथ करोसिया, हैदर नुर शेख, कुरकुंभ येथील अर्थकेम लॅब्रोटरीजचा मालक भीमाजी परशुराम साबळे, ड्रग्ज बनविण्यात माहिर असलेला युवराज बब्रुवान भुजबळ आणि आयुब मकानदार यांना अटक केली होती. तर पुढे सुनील बर्मन, अशोक मंडल, शोएब शेख, पप्पू कुरेशी, अली शेख, सॅम ऊर्फ ब्राउन आणि मास्टर माइंड संदीप धुनिया यांच्यावरही या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
पुण्यातील ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचा छडा लावल्यानंतर समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून गुन्हे शाखेने मेफेड्रॉन विक्रेत्या वैभव मानेला अटक केली होती. त्याच्यासह त्याच्या साथीदाराकडून एक कोटीचे ड्रग्ज पकडण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर हे ड्रग्ज त्याला विश्रांतवाडी येथील हैदर शेखने दिले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हैदरला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी १०५ कोटींचे तब्बल ५२ किलो ५२० ग्रॅम ड्रग्ज जप्त केले. पुढे त्याच लिंकचा आधार घेत पोलिसांना कुरकुंभ येथील अर्थकेम कारखाना गाठला. या ठिकाणाहून पोलिसांनी तब्बल १ हजार ३२७ कोटी ६० लाखांचे ६६३ किलो ८०० ग्रॅम ड्रग्ज जप्त केले. हे सर्व मेफेड्रॉन कुरकुंभ येथील अर्थकेम कारखान्यातूनच तस्करी होत असल्याचे तपासात समोर आले.
याच कारखान्यातून हे ड्रग्ज दिल्ली तसेच इतर राज्यात वितरित होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. येथीलच ड्रग्ज पुढे आंतराष्ट्रीय बाजारात म्हणजे विमानाद्वारे लंडनलादेखील गेल्याचे निष्पन्न झाले होते. पुणे पोलिसांनी सांगली आणि दिल्ली येथील गोदामामधूनही मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त केले. यामध्ये अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या संदीप धुनिया ऊर्फ धुणेचे नाव पुढे आले होते. तोच या ड्रग्ज प्रकरणाचा मास्टर माईंड असल्याचे नंतर तपासात निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत याप्रकरणात १ हजार ८३६ किलो मेफेड्रॉन पकडण्यात आले आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३ हजार ६७४ कोटी ३५ लाख ३० हजार आहे.
या तपासावर सुरुवातीपासूनच राष्ट्रीय तपास यंत्रणा एनसीबी, एनआय लक्ष ठेवून होती. या प्रकरणाची लिंक आंतराष्ट्रीय पातळीवर जात असल्याने व याची दहशतवादी कारवाईशी काही लिंक आहे का? या दृष्टीने तपासात स्थानिक येणाऱ्या मर्यादा पाहता हा तपास आता पुणे पोलिसांकडून काढून एनसीबीडे देण्यात आला आहे.
अशी हाेती लिंक :
गुन्ह्यातील मुख्य आरोपी संदीप धुनिया याच्यासह साथीदारांचा शोध सुरू आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये आरोपींच्या टोळीने मुख्यत्वे हैदर शेख याने पप्पू कुरेशीला पुणे, महाराष्ट्रात तसेच दिल्ली येथे मेफेड्रॉन तस्करी करण्यासाठी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पप्पू कुरेशी हा सातत्याने संदीप धुणे ऊर्फ धुनिया, शोएब शेख यांच्या संपर्कात होता. त्याने आरोपींच्या मदतीने पुण्यात गोदाम भाडेतत्त्वावर घेतले होते तेथे मेफेड्रॉन सापडले होते.