पुणे : पुरंदर तालुक्यात सासवड येथे झालेल्या कृषी आणि पशुसंवर्धन प्रदर्शनाच्या आर्थिक व्यवहाराची अखेर चौकशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. यासाठी आज द्विसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या प्रदर्शनात मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करीत त्याचे आॅडिट करा, अशी मागणी काही सदस्यांनी केली होती. तरीही हिशेब मिळत नसल्याने शुक्रवारी (ता. २०) सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व विरोधी पक्ष सदस्य जिल्हा परिषदेच्या गेटवर उपोषणाला बसले होते. प्रदर्शनाच्या निधीचा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा सदस्यांनी घेतला. यावर अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सदस्यांची मनधारणा करून संबंधित प्रकरणाची चौकशी करून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार आज चौकशी करण्यासाठी द्विसदस्यीय समिती गठित करण्यात आली. यात लेखा व वित्त विभागाच्या प्रमुख भारती देशमुख व सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांची नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)
सासवडच्या प्रदर्शनाची होणार चौकशी
By admin | Published: March 31, 2015 12:28 AM