पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमधील (बीएचआर) फसवणुकीच्या प्रकरणात अवसायक जितेंद्र कंडारे व इतरांनी संगनमत करुन काही कोटी रुपयांची मालमत्ता कवडीमोल किमतीत विकली, असल्याचा ठेवीदारांचे म्हणणे आहे. पुणे शहर आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या कागदपत्रांची संगती लावून त्यातून खरोखरच आरोपींनी या मालमत्ता किती कमी किंमतीला विकल्या. त्यांचा त्यावेळी बाजारभाव काय होता आणि प्रत्यक्षात त्या कितीला विकण्यात आल्या याचा शोध घेण्यात येत आहे.
आरोपी कंडारे, विवेक ठाकरे व इतरांनी ठेवीदारांना आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांचे १०० टक्के पैसे परत केले नाहीत. खात्यावर एक रक्कम दाखविण्यात आली व प्रत्यक्षात ठेवीदारांना त्यापेक्षा किती कमी रक्कम दिली, याचा तपास केला जात आहे. त्यासाठी प्रत्येक ठेवीदाराचे खाते आणि आरोपींकडून जप्त केलेली कागदपत्रे याचा ताळमेळ लावण्याचे काम सध्या सुरु आहे. या कामाला साधारण एक महिन्याचा कालावधी लागू शकतो, असे आताच्या परिस्थितीवरुन दिसून येते. प्रत्यक्ष ही कागदपत्रे तपासणी सुरु केल्यावर त्यातून आणखी काही माहिती पुढे आल्यावर त्याअनुशंषाने तपास वाढत जाण्याची शक्यता आहे.
याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांनी सांगितले की, मुख्य फिर्यादीमध्ये जे जे आरोप केले आहेत. त्याचे व्हरीफिकेशन सध्या करण्यात येत आहेत. त्याचबरोबर फॅारेन्सिक ऑडिट करणार आहे. त्यावरुन नेमकी आर्थिक परिस्थिती समजणार आहे. सध्या त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
यातील आराेपींनी ठेवीदारांना शंभर टक्के पैसे परत करण्याचे दाखवून प्रत्यक्षात केवळ ३० टक्के रक्कमच ठेवीदारांना दिली आहे. याबाबत नेमकी परिस्थिती काय. किती ठेवीदारांना कमी रक्कम देण्यात आली. विवेक ठाकरे यांनी किती जणांची कागदपत्रे स्वत: कडे घेतली. त्यातील किती मुळ कागदपत्रे आहेत. अशा सर्व कागदपत्रांची जुळवा जुळव करण्याचे काम सध्या सुरु आहे.
----
तिघांचा जामीनासाठी अर्ज
या प्रकरणातील ५ जणांची रविवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यापैकी विवेक ठाकरे, सुजित वाणी यांच्यासह तिघांनी विशेष न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर प्रकाश वाणी, अनिल पगारिया यांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करताना आठवड्यातून दोन दिवस पोलिसांना तपासासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सध्या त्यांच्याकडून कागदपत्र्यांची खातरजमा करण्याचे काम सुरु आहे. याशिवाय कृणाल शहा याचा अंतरिम अटक पूर्व जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्याने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. या सर्व अर्जाची येत्या १६ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे.