पुणे : मुंबई महापालिकेमधील कोविड सेंटरमधील घोटाळा बाहेर आला. त्यावेळी अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली होती. कोणताही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार झाल्या होत्या. लोकांच्या जिवाशी अक्षरश: खेळण्यात आले. पुण्यात तर एका पत्रकाराचाच मृत्यू झाला. त्यामुळे यासंदर्भातील चौकशी चालली आहे. ही चौकशी कुठपर्यंत पोहोचली, या छाप्यात काय मिळालं आहे हे ईडी सांगू शकेल. मला माहिती नाही. ज्या लोकांचे कनेक्शन असतील त्यांची चौकशी सुरु असेल, याबाबत अधिकृतपणे ईडीचे अधिकारीच माहिती देऊ शकतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ईडीकडून एकाचवेळी 15 ठिकाणी छापेमारी सुरु आहे. शिवसेनचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्ती असलेले सुजीत पाटकर, आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांचाही समावेश आहे. यावरुन आणखी किती लोकांची चौकशी सुरु आहे, असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार गिता जैन यांनी काल एका अधिकाऱ्याला मारहाण केली. यावरुन टीका होत आहे.यावर बोलताना फडणवीस म्हणाले, मला असं वाटतं की लोकप्रतिनिधींनी संयम बाळगला पाहिजे. कधीतरी संताप होऊ शकतो, एखाद्या गोष्टीत राग अनावर होऊ शकतो. तरीही लोकप्रतिनिधींनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करणं हेच योग्य आहे.