पुणे : मनसेच्या नगरसेविका जयश्री गजानन मारणे (वय ३८) यांच्या मालमत्तेची गोपनीय चौकशी करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे शाखेने सुरुवात केल्याची माहिती अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी दिली. कुख्यात गुन्हेगार गजा मारणे याच्या संपत्तीची चौकशी करायला पोलिसांनी सुरुवात केल्यानंतर त्याच्या पत्नीच्या मालमत्तेची लाचलुचपतकडून सुरू झालेली चौकशी हा गजासाठी दुसरा झटका मानला जात आहे. कुख्यात गुंड नीलेश घायवळ आणि मारणे टोळीमध्ये भडकलेल्या टोळीयुद्धानंतर पोलिसांनी गुन्हेगारांची आर्थिक रसद तोडण्यासाठी त्यांच्या संपत्तीची चौकशी सुरू केली. सलग दोनखून पाडल्यानंतर ४७ दिवसांनी गजा मारणे आणि पुतण्या रुपेश मारणे हे दोघेही नवी मुंबई पोलिसांकडे हजर झाले. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. जयश्री मारणेंची नगरसेविका होण्यापूर्वीची आणि नंतरची मालमत्ता किती याची चौकशी होणार आहे. तसेच त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय आहेत, याचा धांडोळा घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ. प्रधान यांनी दिली. (प्रतिनिधी)
नगरसेविका मारणे यांच्याही संपत्तीची चौकशी
By admin | Published: December 27, 2014 5:12 AM