लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सिरम इन्स्टिट्युट येथील इमारतीला आग लागून त्यात ५ जणांचा दुदैवी मृत्यु झाला. हा केवळ अपघात होता की घातपात या दृष्टीने तपास केला जाणार आहे. कोरोनावरील लस उत्पादनात भारताला जगात आलेले असाधारण महत्त्व आणि लस उत्पादनातील ‘सिरम’चे आंतरराष्ट्रीय महत्त्व या पार्श्वभूमीवर सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत.
सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सद्यस्थिती लक्षात घेऊन सिरममधील दुर्घटनेचा सर्व बाजूंनी तपास करावा लागेल. राष्ट्रीय पातळीवरुनही या दुर्घटनेकडे गांभिर्याने पाहिले जात आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी या संदर्भात माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. गुप्तचर यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घटना घडल्याने स्थानिक पातळीवर त्याचा तपास होईलच. शिवाय, गुन्हे शाखेच्या वतीने समांतर तपास करण्यात येणार आहे.” आगीचे वृत्त समजताच गुप्ता यांनी पूर्वनियोजित कार्यक्रम बाजूला ठेवत घटनास्थळी हजर झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी रात्री घटनास्थळी भेट दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी (दि. २२) घटनास्थळी भेट देणार आहेत.