पुणे: सोशल मीडियावर पाहिलेली शेअर ट्रेडिंगची जाहिरात एकाला चांगलीच महागात पडली आहे. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याच्या नादात अवघ्या एका महिन्यात तब्बल १५ लाख १३ हजार रुपये गमावले आहे.
या प्रकरणी ल्यूदिया रॉबर्ट सॅम्यूल (वय ५४, रा. उंड्री) यांनी मंगळवारी (दि. ९) विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोल्डमन सकस स्पार्क वेल्थ या व्हाट्सअप ग्रुपच्या वापरकर्त्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ५ मार्च ते ९ एप्रिल २०२४ यादरम्यानच्या काळात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी इन्स्टाग्रामवर ट्रेडिंगची जाहिरात पाहिली. त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ते एका व्हॅाट्सॲप ग्रुपला ॲड झाले. त्यानंतर ग्रुपवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी, हे शिकवले जात होते. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे सांगितले जात होते. त्यानंतर फिर्यादींना शेअर्स आणि आयपीओ यामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांच्या ॲपवर शेअर ट्रेडिंगमधून फायदा झाल्याचे दिसून येत होते. आणखी पैसे मिळतील, असे आमिष दाखवून तक्रारदार यांना एकूण १५ लाख १३ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र, काही कालावधीनंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक खांदारे करत आहेत.