पुणे : जिममध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेची ५ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी प्रेरणा शिवाजी ढाकणे (२९, रा. शिंदे डेअरी जवळ, खराडी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून झेउर रेहमान आणि इतरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ४ मार्च २०२० ते ५ ऑक्टोबर २०२२ दरम्यान घडली आहे.
अधिक माहितीनुसार, आरोपी झेउर रेहमान हे फिक्शन फिटनेस जिमचे मालक आहेत. फिर्यादी प्रेरणा ढाकणे आणि झेउर रेहमान यांची ओळख झाली होती. झेउर रेहमान याने फिर्यादी महिलेला चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ५ लाख रुपये जिममध्ये गुंतवणूक करायला सांगितले. फिर्यादी यांनी झेउर रेहमान यांच्या पत्नीच्या बँक खात्यावर ५ लाख रुपये पाठवले. आरोपीने हे पैसे जिममध्ये गुंतवणूक करून परतावा न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रेवले करत आहेत.