पुणे: शेअर ट्रेडिंग करून भरपूर पैसे कमावण्याच्या नादात एका हॉटेल व्यावसायिकाने तब्बल ४३ लाख रुपये गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. १४) लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प परिसरात राहणाऱ्या सचिन वसंत केदारी (वय- ५२) यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. हा प्रकार १८ फेब्रुवारी ते १५ मे यादरम्यानच्या काळात घडल्याचे तक्रारदार यांनी सांगितले आहे. सायबर चोरट्याने व्हॉट्सॲपवरून तक्रारदार यांच्याशी संपर्क साधला. शेअर मार्केट ट्रेडिंग, ब्लॉक तेरडींग, आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा आणि परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवले. तक्रारदार यांनी आमिषाला बळी पडून पैसे गुंतवण्यास होकार दिला. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून व्हाॅट्सॲप जॉइन करायला सांगितले. ग्रुप जॉइन केल्यावर ट्रेडिंग करण्यासाठी एक ॲप डाऊनलोड करायला सांगितले. फिर्यादींनी ॲप्लिकेशन डाऊनलोड करून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यांनी एकूण ४८ लाख रुपयांची गुंतवणूक केली. यानंतर त्यांना ५ लाख रुपये मोबदला देण्यात आला. शेअर ट्रेडिंगमधून फायदा होत आहे असा विश्वास बसल्याने त्यांनी पैश्यांची गुंतवणूक सुरु ठेवली. काही काळानंतर मात्र, त्यांना ते पैसे काढता येत नव्हते. त्यांनी सायबर चोरट्यांशी संपर्क केला, तेव्हा वेळोवेळी आणखी पैसे भरायला सांगितले. पैसे मिळणार नाहीत, याची खात्री झाल्यावर तक्रारदारांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास पोलिस निरीक्षक पवार करत आहेत.