लोकमत न्यूज नेटवर्क
चाकण : चाकण ते भांबोली दरम्यानच्या रस्त्याच्या नूतनीकरणाला करोडो रुपयांचा निधी खर्च करून सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बंदिस्त पाइपलाइन करण्यात आली आहे. परंतु आंबेठाण चौकातील पाईप टाकण्याचे काम अपूर्ण ठेवल्याने सांडपाण्याच्या दुर्गंधीने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी संबंधित ठेकेदाराने त्वरित काम पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.
चाकण ते भांबोली दरम्यानच्या रस्त्याच्या नूतनीकरणाची गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वाकडे जात आहे. परंतु रस्त्याच्या कामात स्थानिक पातळीवर ठराविक लोकांनी रस्ता आमच्या हद्दीत येत असल्याचे सांगत काम करू न दिल्याने कामात अडथळे निर्माण झाले आहे. यामुळे रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी वेळ लागतो आहे. परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे याचा फटका प्रवासी नागरिकांना बसत आहे. अनेक ठिकाणी शंभर ते दोनशे मीटर दरम्यान तुकड्यांचे रस्त्याचे काम एका बाजूने पूर्ण केले नसल्याने वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते आहे. यामुळे या ठिकाणी वाहतूककोंडी होऊन, सतत लहान मोठे अपघात होत आहेत.
रस्ता नूतनीकरण करण्यासाठी आंबेठाण चौकातील अतिक्रमण काढण्यात आली आहे. तरीही येथील रस्त्याचे नूतनीकरण काम सुरू करण्यात आले नाही. सांडपाणी वाहून नेण्यासाठी पाईपही टाकण्यात आले नाही. यामुळे उघड्या गटारामुळे सांडपाण्याचा दुर्गंधीयुक्त वास येत आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यवसायिकांसह स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
चौकट
आंबेठाण मुख्य चौकात सतत वाहनांची व नागरिकांची मोठी वर्दळ असते. येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांना या उघड्या गटाराचा अंदाज येत नाही. यामुळे अनेक लोक यामध्ये पडून अपघात घडत आहेत. परंतु डोळ्यावर कातडी पांघरलेल्या सार्वजनिक बांधकाम व संबधित ठेकेदाराला हे दिसत नाही का ? असा संतप्त सवाल येथील व्यवसाययिकांनी केला आहे.
फोटो - आंबेठाण चौकातील उघडे गटार.