लोकमत न्यूज नेटवर्कशिक्रापूर : येथे पुणे-नगर रस्त्यावर अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या फ्लेक्सच्या मनोऱ्यांमुळे अपघाताना आमंत्रण मिळत असून अनेक अनधिक्रूत मनोरे काढून टाकण्याची मागणी नागरिक करत आहे.वाहतूककोंडी व त्याचबरोबर रोडच्या कडेला असलेले फ्लेक्सचे मोठे मनोरे आहेत. त्यातच फ्लेक्सची वाढती क्रेझ व त्यातूनच शिक्रापूरपासून वाघोली व शिरूरपर्यंत अनेक ठिकाणी धोकादायक फ्लेक्स आहेत. या फ्लेक्समुळे यापूर्वीही अनेकदा अपघात झालेले आहेत. शिक्रापूर येथे यापूर्वी एका ठिकाणी फ्लेक्सच्या मनोऱ्यावर चढून फ्लेक्स लावत असताना एका युवकाला विजेचा धक्का बसला होता. एका ठिकाणी मनोरा वाहनांवर पडून चार वाहनांचे एकाच वेळी नुकसान झाले आहे. तर एका ठिकाणी एका मोठ्या दुकानावर हा मनोरा पडून दुकानाचे मोठे नुकसान झाले होते तर यावेळी या दुकानामध्ये असलेले नागरिक सुदैवाने बचावले होते. असे प्रकार वारंवार होत असताना देखील प्रशासनास जाग आलेली नाही. अनेकदा वाऱ्यामुळे फ्लेक्स फाटले जाऊन शेजारी असलेल्या विजेंच्या तारांना अडकून विजेच्या तारांचे घर्षण होऊन मोठमोठे जाळाचे लोट खाली पडत आहेत. विजेच्या तारा तुटून नागरिकांना रात्र रात्र अंधारात राहावे लागत आहे.बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आलेल्या वाऱ्यामुळे येथील फ्लेक्स फाटला जाऊन शेजारील तारांना अडकला गेला. मोठा जाळ खाली पडून विजेच्या तारा देखील तुटल्या. सर्वत्र अंधार पसरला गेला परंतु महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या सुमारास मोठे प्रयत्न करून विजेच्या तुटलेल्या तारा जोडल्या. अनेकदा अशा प्रकारे तारा तुटण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत विद्युत वितरण विभागाचे शाखा अभियंता संजय पोफळे यांच्याशी चर्चा केली असता, या भागातील फ्लेक्सचे सर्व मनोरे काढण्यासाठी तसेच कारवाई करण्यासाठी मी स्वत: शिक्रापूर पोलीस स्टेशन तसेच ग्रामपंचायत शिक्रापूर येथे अर्ज दिलेले आहेत.
अनधिकृत फ्लेक्समुळे अपघातांना आमंत्रण
By admin | Published: June 10, 2017 1:57 AM