कुरकुंभ : कुरकुंभ येथील मुख्य चौकातून बारामतीकडे जाणाऱ्या रस्त्याचे राज्य मार्गातून राष्ट्रीय महामार्ग असे रूपांतर होऊन मोठ्या प्रमाणत नूतनीकरण करण्यात आले. अनेक दिवसांच्या खलबतानंतर कसाबसा हा रस्ता नागरिकांना खुला करण्यात आला खरा, मात्र या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी मुख्य चौकात निर्माण करण्यात आलेल्या पुलाखाली राडारोडा पडल्यामुळे गटाराचे पाणी तुंबत आहे व परिणामी याचा प्रत्यक्ष सामना रोज ग्रामस्थांना व प्रवाशांना करावा लागत आहे.
सध्या कोरोनासोबतच डेंग्यू, मलेरिया व प्रामुख्याने झिका विषाणूचा धोका असताना अशा प्रकारे गटाराचे सांडपाणी तुंबणे हे अतिशय धोकदायक ठरू शकते. झिका विषाणूच्या प्रादुर्भावाच्या संवेदनशील गावाच्या यादीत कुरकुंभचे देखील नाव असल्याने नुकतेच ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून धूरफवारणी करण्यात आली आहे व परत दुसऱ्यांदा ही फवारणी लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे याबाबत अतिशय गांभीर्याने विचार करून कारवाई करणे गरजेचे आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत रस्ता नूतनीकरण करणाऱ्या कंत्राटदाराला सूचना करून तुंबलेल्या गटाराला प्रवाहित करणे आवश्यक आहे. याच गटाराच्या परिसरातच प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजारतळ, मुख्य चौकातील हॉटेल्स व दुकाने आहेत. बारामती व पुण्याकडे जाण्यासाठी प्रवाशांनादेखील याच परिसरात उभे राहावे लागते त्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.