पुणे : पावसाळ्यात दूषित अन्न, पाण्यातून टायफाईड म्हणजे विषमज्वर होण्याची शक्यता वाढते. विशेषत:, हातगाडीवरचे पदार्थ खाताना बरेचदा स्वच्छता पाळली जात नाही. पाणीपुरी, वडापाव असे उघड्यावरचे पदार्थ खाताना नागरिकांनी जास्त दक्ष राहायला हवे, अन्यथा टायफॉईडला आमंत्रण मिळेल, असा इशारा डॉक्टरांकडून दिला जात आहे.
अस्वच्छ वातावरणात सालमोनेला टायफी हा जीवाणू विकसित होतो. उघडे अन्न किंवा पाण्यात जीवाणू मिसळल्यास ते दूषित होते. अन्न किंवा पाण्यातून जीवाणू रक्तप्रवाहात प्रवेश करतो आणि त्यातून विषमज्वराची लागण होते. टायफी हे जीवाणू रुग्णाच्या मूत्रामधून किंवा विष्ठेतून संक्रमित होण्याचीही शक्यता असते. टायफॉईडची अर्थात विषमज्वराची लक्षणे लागण झाल्यानंतर १ ते १४ दिवसांनी दिसू लागतात.
कोरोना काळामध्ये बऱ्याच विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. मागील वर्षी कोरोनाची साथ आल्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाले. सर्व व्यवहार बंद झाल्याने घरातून बाहेर पडणेही बंद झाले. बाहेरचे खाणे, हॉटेलिंग बंद झाल्यामुळे आजारांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे मागील पावसाळ्यात टायफॉईडच्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प होते. आता पावसाळा सुरु असताना सर्व व्यवहारही सुरळीत झाले आहेत. वर्षभराने बाहेर पडता येत असल्याने हॉटेलिंग, चाट, वडा असे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, अस्वच्छतेचा आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी काळजी घेण्यास सांगितले जात आहे.
----------------
पावसाळ्यात दूषित पाणी आणि अन्नातून टायफॉईड होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या कालावधीत स्वच्छ, उकळलेले, ताजे पाणी प्यावे. ताजे अन्नपदार्थ खावेत. शक्यतो बाहेर दुधाचे पदार्थ खाणे टाळावे. कोरोनाकाळात टायफॉईडचे प्रमाण कमी झाले असले तरी यंदाच्या पावसाळ्यात जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. सुह्रद देसाई, जनरल फिजिशियन
------------------
लक्षणे :
ताप
पोटदुखी
जुलाब
थकवा
भूक कमी होणे
डोकेदुखी, अंगदुखी
----------------------
जिल्हा रुग्णालयातील टायफॉईड रुग्णांची आकडेवारी :
जून - ०
जुलै - ५
आॅगस्ट - १