पुणे : जल संवर्धनामध्ये जिल्ह्यातील युवकांचा सहभाग वाढणे आवश्यक असून, यासाठी नेहरू युवा केंद्राने पुढाकार घ्यावा असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
नेहरू युवा केंद्राच्या वतीने युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या वेळी जिल्हास्तरीय ‘कॅच द रेन’ अभियानाचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी उद्घाटन केले. त्यानंतर ते बोलत होते. जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे अजय शिंदे, जिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी प्रसाद सोनावणे आदी या वेळी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय युवा मंडळांच्या पुरस्कारांची घोषणा बैठकीत करण्यात आली. यावर्षीचा प्रथम वर्षाचा पुरस्कार ग्रामीण तंत्रज्ञान संस्था- नाव्हरे, द्वितीय पुरस्कार तथागत बहुउद्देशीय संस्था, पुणे आणि तृतीय क्रमांक अरुणदादा बेल्हेकर बहुउद्देशीय संस्था यांना घोषित करण्यात आले. या वेळी डॉ. देशमुख यांनी उपस्थितांना ‘राष्ट्रीय जल शपथ’ दिली. जिल्ह्यातील शालाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने पुरस्कार दिलेल्या चेतन परदेशी यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.