कोल्हापूर : नोटाबंदीमुळे पडून असलेला पैसा बँकांमध्ये जमा झाला. तो पुन्हा चलनात आला. त्याचा फायदा तर झालाच; परंतु यामुळे डिजिटल व्यवहारांना मोठी चालना मिळाली, असे मत स्टेट बँकेच्या रिटेल आणि डिजिटल बँकिंग विभागाचे कार्यकारी संचालक परवीनकुमार गुप्ता यांनी व्यक्त केले.
कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेल्या गुप्ता यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे मत व्यक्त केले. शुक्रवारी सकाळी गुप्ता यांच्या हस्ते राजारामपुरी शाखेजवळ ई-कॉर्नरचे उद्घाटन झाले. या ठिकाणी पैसे भरणे, काढणे आणि पासबुक भरण्याची सेवा उपलब्ध केली आहे. गुप्ता म्हणाले, कोल्हापूरमध्ये कृषीक्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक आहे; त्यामुळे बँकेने मोठ्या प्रमाणावर कृषी पतपुरवठा केला आहे. नोटाबंदीनंतरच्या दोन वर्षांनंतरच्या परिस्थितीबाबत विचारता ते म्हणाले, मोठ्या प्रमाणावर पैसा पडून होता. तो बँकेमध्ये आला नव्हता; परंतु नोटाबंदीमुळे तो बँकांमध्ये भरला गेला. बँकांना कर्जवितरणासाठी भांडवल उपलब्ध झाले. पर्यायाने देशासाठी ही नोटाबंदी उपयुक्त ठरली. बँकेच्या ‘योनो’ अॅपची माहिती सांगताना ते म्हणाले, या अॅपमध्ये तीन प्रकारच्या सुविधा आम्ही ग्राहकांना उपलब्ध करून देत आहोत. बँकिंग सुविधा तर आहेच. त्यासोबतच ‘एसबीआय’च्या सर्व विमा योजना, म्युच्युअल फंडाचीही सुविधा देण्यात आली आहे.तसेच टाईप केलेल्या ८५ ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहक खरेदीही करू शकतात. ज्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त सवलत दिली जाते. काही घटनांमुळे कर्जदारांबाबत आता केंद्र शासनाने कडक धोरण स्वीकारले असून, बँकेनेही भ्रष्टाचाराविरोधी जनजागरण सुरू केले आहे.बँकेकडे उपलब्ध असलेल्या माहितीचे विश्लेषण करूनग्राहकांना अधिकाधिक गतिमान सेवा देण्यावर भर राहील, असे गुप्तायांनी सांगितले. त्यावेळी सरव्यवस्थापक संजयकुमार, पुणे उपव्यवस्थापक आबिदूर रहमान, विभागीय व्यवस्थापक प्रदीप देव उपस्थित होते.पारदर्शकता वाढलीनोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहाराला सरकारने पाठिंबा दिला. प्रोत्साहन दिले. यामुळे एटीएम, इंटरनेट बँकिंग, स्मार्टफोनच्या माध्यमातून बँकिंगमध्ये वाढ झाली. ज्यामुळे पारदर्शकताही वाढली. स्टेट बँकेचे ८३ टक्के व्यवहार ‘एटीएम’च्या माध्यमातून होत असून, केवळ १३ टक्के व्यवहार बँकेतून होतात, असेही परवीनकुमार गुप्ता यांनी सांगितले.