येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकात पुणे जिल्हा परिषद, पुणे व शिरूर पंचायत समितीच्या वतीने आमचा गाव, आमचा विकास अंतर्गत गणस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी साकोरे बोलत होते. या कार्यशाळेसाठी तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, दरेकरवाडी, धानोरे ,डिंग्रजवाडी, टाकळी भीमा या सहा गावांतील ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्राम संसाधन गटाचे सदस्य यासह ग्रामसेवक दादासाहेब नाथ, सदानंद फडतरे, आरती गोसावी, विमल आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोविंद ढमढेरे,आरती भुजबळ, ॲड.सुरेश भुजबळ, बचत गटाच्या चेतना ढमढेरे या सर्वांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, गावचा विकास आराखडा राबवताना प्रशासनाने पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी केल्यास कोणत्याही प्रभागावर अन्याय होणार नाही. गोविंद ढमढेरे यांनी तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीची करवसुली साधारण साडे आठ कोटी रुपयांची असून ग्रामस्थांनी कर जमा करण्याचे आवाहन केले.
सन २०२०-२१ते२०२४-२५ पर्यंत पंचवार्षिक विकास आराखडा बनविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना या कार्यशाळेत करण्यात आल्या.
प्रत्यक्ष आराखडा तयार करण्यापूर्वी वंचित घटकाची सभा, बाल सभा व महिला सभा घेण्यात येणार आहेत. त्यानंतरच गावच्या ग्रामसभेत आमचा गाव, आमचा विकास आराखडा मंजूर झाल्यानंतरच विविध निधीच्या माध्यमातून प्रत्यक्ष गावच्या विकासकामांना प्रारंभ होणार आहे. ग्रामपंचायतीचा स्वनिधी,१५ वा वित्तआयोग,मनरेगा,स्वच्छ भारत अभियान इतर बक्षिसे या निधीअंतर्गत हा विकास आराखडा बनवताना ५० टक्के बंधीतनिधी व ५० टक्के अबंधीत निधी याप्रमाणे आमचा गाव, आमचा विकास आराखडा याचे नियोजन करायचे आहे. बंधीत निधीअंतर्गत आरोग्य,पाणीपुरवठा व इतर खर्च करणे तर बंधीत निधीअंतर्गत १० टक्के निधी प्रशासकीय खर्च व उर्वरित विकासकामांवर खर्च करणे बंधनकारक राहणार आहे. असे ग्रामसेवक दादासाहेब नाथ यांनी सांगितले.
तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथे आमचा गाव-आमचा विकास अंतर्गत कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विस्तार अधिकारी अजित साकोरे.