पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील फसवणूक व अपहार प्रकरणात जळगाव येथील भाजपचे विधान परिषदेचे आमदार चंदुलाल पटेल हे देखील संशयित आरोपी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक महिन्यापूर्वीच त्यांच्याविरूध्द अटक वॉरंट निघाले होते. हा प्रकार नुकताच समोर आला आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव शहर, जामनेर, भुसावळ औरंगाबाद, धुळे, मुंबई, अकोला आणि पुणे या सहा जिल्ह्यात एकाचवेळी छापेमारी करत तब्बल १२ जणांना अटक केली होती. त्यावेळीच पटेल यांच्याविरोधात अटक वाॅॅरंट काढण्यात आले होते.
यावेळी सराफ तथा हॉटेल व्यावसायिक भागवत भंगाळे, दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम नारायण कोगटा, संजय तोतला, जयश्री शैलेश मणियार (सर्व रा. जळगाव) जितेंद्र रमेश पाटील, कापूस व्यापारी राजेश लोढा (रा. जामनेर), जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झाल्टे, भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष आसिफ मुन्ना तेली (रा. भुसावळ), प्रितेश चंपालाल जैन (रा. धुळे), अंबादास आबाजी मानकापे (रा. औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (रा. मुंबई) व प्रमोद किसनराव कापसे (रा. अकोला) या १२ जणांना अटक झाली होती. त्यातच आमदार चांदुलाल पटेल यांच्याविरोधात देखील अटक वाॅॅरंट निघाले होते. याप्रकरणात बरेच दिवस फरार असलेल्या अवसायक जितेंद्र खंदारेला नुकतीच अटक करण्यात आली होती. याप्रकरणात आतापर्यंत १८ जणांना अटक झाली आहे.
..........
बीएचआरप्रकरणी पुणे पोलिसांनी एकाचवेळी जळगाव, औरंगाबाद, पुणे, धुळे अशा सहा जिल्ह्यात छापे टाकून बारा जणांना अटक केली होती. महिनाभरापूर्वी झालेल्या कारवाईवेळी चंदुलाल पटेल यांच्या विरोधातही अटक वॉरंट निघाले होते. ते या प्रकरणात फरार आहेत.
- भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे व सायबर.