पिंपरी : थेरगाव येथील व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमीच्या श्रध्दा पोखरकर हिची महिला आयपीएल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. २३ मेपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत श्रद्धा ट्रायब्लाझर्स या संघातून खेळताना दिसणार आहे.
आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावच्या श्रद्धा भाऊसाहेब पोखरकर या शेतकरी कुटुंबातील आहेत. श्रद्धाचे प्राथमिक शिक्षण थोरांदळे गावात झाले. पिंपरीतील डी.वाय. पाटील महाविद्यातून तिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. क्रिकेट खेळाची तिला लहानपणापासूनच आवड असल्याने दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीत तिने सरावाला सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांपासून ती व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमीत प्रशिक्षण घेत आहे. श्रद्धा ही महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे.
यावर्षी झालेल्या महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाकडून खेळताना श्रद्धाने अष्टपैलू कामगिरीने सर्वांच्याच नजरा वेधल्या. श्रद्धा ही डावखुऱ्या हाताने वेगाने गोलंदाजी करते. तसेच मधल्या फळीत फलंदाजी करते. भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाच्यावतीने काही दिवसांपूर्वी वरिष्ठ महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये श्रद्धाने अष्टपैलू कामगिरी करताना नऊ विकेट घेतल्या. सध्या आयपीएलसाठी निवड झाल्याबद्दल तिचे कौतुक होत आहे.
भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची इच्छा
मोहन जाधव, भूषण सूर्यवंशी, डॉ. विजय पाटील, शादाब शेख, चंदन गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव केला. भारताची माजी क्रिकेट खेळाडू झुलन गोस्वामी व वेगवान गोलंदाज आशिष नेहरा हे तिचे आवडते खेळाडू आहेत. भविष्यात भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची इच्छा आहे. त्यासाठी मेहनत घेत आहे.