पुणे : चेन्नई सूपर किंग आणि कोलकाता नाईट राईडर्स यांच्यातील आयपीएलमधील रविवारच्या थरारक सामन्यात बेटिंग घेत असताना पुणेपोलिसांनी रास्ता पेठ व मार्केटयार्ड येथे एकाचवेळी कारवाई करुन दोघा आंतरराष्ट्रीय बुकींना अटक केली. हे दोघे क्रिकेट लाईन गुरु, बेटवेअर, क्रिकेट एक्सचेंज या ॲपद्वारे मोठ्या प्रमाणावर बेटिंग घेत असल्याचे आढळून आले. पुणे पोलीस गेल्या ६ महिन्यांपासून त्यांच्या मागावर होते. यापूर्वीच्या आयपीएलच्या पहिल्या पर्वापासून त्यांच्यावर पोलिसांचा वॉच होता. मात्र, आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पर्धा अचानक स्थगित झाली होती.
गणेश भिवराज भुतडा (वय ५०, रा. त्रिमूर्ती सोसायटी, रस्ता पेठ) आणि अशोक भवरलाल जैन (वय ४६, रा. हाईड पार्क, मार्केट यार्ड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस फाैजदार भालचंद्र तावरे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश भुतडा याच्या घरी छापा घालता असताना त्याच्या मोबाईलवर जुगाराचे अंक लिहिलेल्या २७ चिठ्ठ्या आढळून आल्या. त्याच्याकडील ३ मोबाईलवर क्रिकेट एक्सचेंज हे ॲप्लिकेशन आढळून आले. क्रिकेट सामना सुरु असताना अत्यंत छोट्या कालावधीत अंसख्य कॉल केल्याचे व आल्याचे दिसून आले. ऑनलाईन पद्धतीने स्थानिक बुकीकडून अंक सट्ट्याचा जुगाराच्या खेळावर पैसे लावून खेळ खेळत असल्याचे निष्पन्न झाले. कपाटातील दोन बँगामध्ये ९२ लाख रुपये तसेच ६५ हजार रुपयांचे तीन मोबाईल व नोटा मोजण्याचे मशीन जप्त करण्यात आले आहे. त्याच्या मोबाईलमधील सीमकार्ड हे दुसऱ्या नावाने प्राप्त करुन त्याद्वारे सट्टा घेत होता.
आयपीएल सट्ट्यावर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकींना अटक
दुसऱ्या प्रकरणात पोलीस शिपाई संजय कांबळे यांनी मार्केटयार्ड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड व त्यांच्या पथकाने मार्केटयार्ड येथील हाईड पार्कमधील अशोक जैन याच्या घरावर छापा घातला. घरात ७ मोबाईल, ५१ हजार ७०० रुपये जप्त करण्यात आले. या मोबाईलमध्ये क्रिकेट लाइन गुरु, बेटवेअर हे क्रिकेट बेटिंग करीता असलेले ॲप आढळून आले. या मोबाईलमधील सीमकार्ड बनावट कागदपत्राद्वारे मिळविल्याचे आढळून आले आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, प्रभारी अपर पोलीस आयुक्त भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा व सामाजिक सुरक्षा विभागातील पथकाने ही कामगिरी केली.