बारामती : बारामतीचा शहरातील अभिषेक सतीश ननवरे या युवकाने दक्षिण आफ्रिका येथे शनिवारी पार पडलेली आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. भारतातून सर्वाधिक कमी वयाचा आयर्नमॅन होण्याचा विक्रम अभिषेकने वयाच्या १८ व्या वर्षी केला आहे. आयर्नमॅन होण्यासाठी निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेत ही स्पर्धा पूर्ण करत ‘आयर्नमॅन’ हा जगविख्यात मानला जाणारा मानाचा किताब मिळविला आहे.
बारामतीचे पहिले आयर्नमॅन ,तसेच जागतिक पातळीवर तीनदा आयर्नमॅन झालेले सतीश ननवरे हे अभिषेकचे वडील आहेत. आपल्या पित्याकडून प्रेरणा घेत त्यांचेच मार्गदर्शन घेत अभिषेक ने हे यश मिळविले आहे. दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ येथे ही स्पर्धा पार पडली. या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेक याने १३ तास ३३ मिनिटांची वेळ नोंदवून आयर्नमॅन किताब पटकावला. १८० कि.मी. सायकलींग, ४२.२ कि.मी. धावणे व ३.८ कि.मी. समुद्रात पोहोण्याचा या स्पर्धेत समावेश आहे. सर्व आव्हाने एकापाठोपाठ कोणतीही विश्रांती न घेता पूर्ण करायची असतात. यासाठी स्पर्धकांच्या शारिरीक क्षमतेचा कस लागतो. जागतिक स्तरावरील व्यावसायिक स्पर्धक यात सहभागी होतात. मात्र,जिद्दीच्या बळावर अभिषेकने हे आव्हान यशस्वीपणे पेलले. उत्तम वेळेची कामगिरी नोंदवत त्याने भारतातील ग्रामीण भागातील सर्वात युवा आयर्नमॅन बनण्याची कामगिरी करुन दाखवली. तो बारामतीत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गेल्या दीड वर्षांपासून त्याने आयर्नमॅनसाठी तयारी सुरु होती. अभिषेक हा एक व्यावसायिक असून त्याची स्वत:ची सायकल ट्रेडींगची कंपनी आहे. सायकलिंगला प्रोत्साहन मिळावे व युवकांची तब्येत अधिक सुदृढ ठेवण्याचा संदेश अभिषेक याने युवकांना दिला आहे.
सुप्रिया सुळे यांनी केले अभिनंदन
दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ येथे पार पडलेल्या जागतिक पातळीवरील आयर्नमॅन स्पर्धेत बारामती येथील अभिषेक सतीश ननवरे याने यश संपादन केले. ही अतिशय खडतर स्पर्धा त्याने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी पुर्ण केली. या उज्ज्वल यशाबद्दल अभिषेक, त्याचे प्रशिक्षक व पालकांचे हार्दिक अभिनंदन.