धनकवडी : भारती विद्यापीठ भुयारी मार्गावरून सेवा रस्त्याच्या बाजूने बिबवेवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर नॅन्सी लेक होम सोसायटीच्या येथे अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी उभारण्यात आलेली लोखंडी कमान धोकादायक बनली आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून वाहने ये-जा करीत असतात. मात्र अवजड वाहने या मार्गावरून जात असताना कमानीला धडकून लोखंडी कमान पडत आहे.
भारती विद्यापीठ परिसरातील भुयारी मार्गालगतच्या बाजूने सुरू होणारा सेवा रस्ता हा ऋषीकेश सोसायटीमार्गे बिबवेवाडीकडे जातो. कात्रज, भारती विद्यापीठ, बालाजीनगर परिसरातील नागरिक पर्यायी मार्ग म्हणून या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असतात. नॅन्सी लेक होम सोसायटीच्या पुढे गेल्यावर असलेला तीव्र उतार आणि धोकादायक वळण याचा विचार करून या ठिकाणी जड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी लोखंडी कमान उभारण्यात आली आहे. मात्र, परिसरात चालू आसलेल्या बांधकामांच्या साहित्यांची वाहतूक करणारी अवजड वाहने, पाण्याचे टँकर या मार्गे जाताना लोखंडी कमानीचा अंदाज न आल्यामुळे धडकत आहेत व कमान पडत आहे.या अगोदरसुद्धा अनेक वेळा अशाच प्रकारे कमान पडली होती. मात्र, सुदैवाने प्रत्येक वेळेस या ठिकाणी तुरळक वाहतूक असल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही.ऋषीकेश सोसायटीतून लेक टाऊन ते बिबवेवाडीच्या अप्परमार्गे कोंढव्याला जाण्यासाठी हा मार्ग मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. बहुमजली सोसायट्यांमध्ये राहणाºया हजारो नागरिकांसाठी हा मार्ग सोयीस्कर आहे. मात्र, वारंवार घडणाºया अशा घटनांमुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात या ठिकाणी एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करीत आहे.नँन्सी लेक होम सोसायटीचे चेअरमन सतीश रेणुसे म्हणाले, नँन्सी लेक होम सोसायटीच्या बाजूला अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी कमान उभारली आहे. मात्र, पुढे अवघड वाहनांस प्रवेशबंदी आहे, असा सूचनाफलक लावण्यात आला नाही. वाहनचालक जबरदस्तीने वाहन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. कमानीला धडकून कमान पडते. ही घटना वारंवार घडत आहे. याशिवाय बेकायदा पार्किंगच्या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनही वाहतूक पोलीस कसलीही कारवाई करीत नसल्याने सोसायटीची शांतता अबाधित राहावी, यासाठी केलेला सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.