पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळावा यासाठी लाखाे विद्यार्थी प्रयत्न करतात. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) तर्फे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नियमावली तयार केली आहे. मात्र, नियमभंग करीत काही महाविद्यालये संस्था स्तरावरच प्रवेश प्रक्रिया राबवत असल्याच्या तक्रारी सीईटी सेलकडे आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य पद्धतीने प्रवेश झाल्याचे सिद्ध झाल्यास सर्व प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या स्तरावर रद्द करण्यात येतील, असा इशारा दिला आहे.
यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डाॅ. विनाेद मोहितकर यांना प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रियेबाबत आलेल्या तक्रारींबाबत आपल्या स्तरावर आढावा घेण्यात यावा. तसेच संबंधित प्रवेश ‘महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था पूर्णवेळ व्यावसायिक पदवी पूर्व तांत्रिक पाठ्यक्रमांच्या प्रवेशांचे विनियमन नियम २०१७ मधील नियम १३ मधील तरतुदीनुसारच काटेकाेरपणे केले जातील व कार्यवाहीचे प्रभावी पर्यवेक्षण तंत्रशिक्षण संचालनालय स्तरावर केले जाईल, याची दक्षता घेण्यात यावी. त्याचप्रमाणे ज्यात महाविद्यालयात नियमबाह्य पद्धतीने प्रवेश झाल्याचे सिद्ध झाल्यास प्रवेश नियामक प्राधिकरणाचे स्तरावर रद्द हाेतील, असे मोहितकर यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, सीईटी सेलने दिलेल्या नियमानुसार संस्था स्तरावरील कोट्यातील प्रवेश हे कॅप राउंडनंतर होणे बंधनकारक आहे. तसेच दोन्ही कॅप राउंडचा निकाल अर्थात निवड यादी संबंधित महाविद्यालयाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर आणि महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे. प्रथम कॅप फेरी पूर्ण झालेली नसतानाही पुणे शहरातील काही नामांकित महाविद्यालय संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रिया डोनेशन घेत राबवत आहे. तसेच नियम धुडकावून विद्यार्थ्यांना प्रवेश देत आहेत, अशी तक्रार युवा सेना सहसचिव कल्पेश यादव यांनी तंत्रशिक्षण संचालनालय तसेच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडे केली हाेती.