पुणे : कोथरूड येथील एकलव्य शिक्षण संस्थेच्या तंत्रनिकेतनच्या कामकाजात विविध प्रकारच्या त्रुटी असल्याचे चौकशीमध्ये आढळून आले आहे. त्यानुसार पुणे विभागीय तंत्रशिक्षण कार्यालयाने तंत्रशिक्षण संचालकांना याबाबचा अहवाल पाठविला आहे. ठाणे येथील सिटीझन फोरम इन सॅक्टिटी इन एज्युकेशनल सिस्टीम या संस्थेने ‘एकलव्य’च्या कामकाजाबाबत पुणे विभागीय तंत्रशिक्षण कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानुसार चौकशी समिती नेमण्यात आली. संस्थेच्या कामकाजात अनियमितता असल्याचा अहवाल या समितीने विभागीय कार्यालयाकडे सुपूर्त केला आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, सेवापुस्तिका अद्ययावत न ठेवणे, शासकीय नियम व मानकानुसार संस्थेचे प्रशासकीय व शैक्षणिक कार्यपद्धती नसल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच, संस्थेवर कारवाई करण्याची शिफारस समितीने केली होती. त्यानुसार विभागीय कार्यालयाकडून तंत्रशिक्षण संचालनालयाकडे कारवाईबाबत अहवाल पाठविला आहे.
समितीकडून दिला कारवाईचा अहवाल एकलव्य शिक्षण संस्थेच्या तंत्रनिकेतनच्या कामकाजात अनियमितता असल्याचा अहवाल समितीकडून देण्यात आला आहे. सिटीझन फोरमने केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून येत आहे. यात समितीने केलेल्या शिफारशीनुसार कारवाई करण्याचा अहवाल आहे, असे पुणे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डी. आर. नंदनवार यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठविलेल्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. कारवाईबाबतचा निर्णय संचालनालयाच्या पातळीवर घेतला जाईल, असे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.