पुणे: इतिहासाचे गहन अज्ञान असले की बेजबाबदार अनैतिहासिक विधाने कशी केली जातात याचे उत्तम उदाहरण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीर व पंडित नेहरू यांच्यासंदर्भात केलेले विधान होय अशी टीका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांनी केली. देशाचे भाग्यविधाते असलेल्या पंडित नेहरू यांनाच प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार ठरवण्याचा भारतीय जनता पक्षाचा अजेंडाच आहे, मात्र नेहरूंवर प्रेम करणारा एकही भारतीय यावर कधी विश्वास ठेवणार नाही असे त्यांनी सांगितले.
ॲड. छाजेड म्हणाले, घो़डचूक झाली असलीच तर ती याप्रकारात जम्मू काश्मिरचे तत्कालीन सस्थांनिक राजा हरिसिंग यांची आहे. त्यांनी स्वतंत्र भारतात सहभागी होण्यास विलंब लावला. त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून रहायचे होते. महात्मा गांधीजींनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते बधले नाही. दरम्यान पाकिस्तानी टोळीवाल्यांनी काश्मिरवर आक्रमण केले, त्यावेळी हरिसिंग यांना जाग आली व त्यांना पंडित नेहरूंकडे लष्करी साह्य मागितले. स्वत: गांधीजींनी या लष्करी मदतीला अनुमती दिली. मात्र हरिसिंग यांनी हट्टाने ३७० कलमांची निर्मिती करून घेतली. काश्मिर भारतातच घ्यायचे असल्याने ते मान्य करण्याशिवाय त्यावेळी गत्यंतर नव्हते.
हरिसिंग यांच्या विनंतीवरून लष्करी साह्य केले गेले, टोळीवाल्यांना हाकलून देण्यात भारतीय सैन्याला यश मिळाले, मात्र त्याचवेळी युनोने युद्धविराम केल्याचे घोषित केले व टोळीवाल्यांनी ताब्यात घेतलेला काश्मिरचा भाग पाकव्याप्त काश्मिर झाला, उर्वरित भाग भारतातच राहिला. नेहरू त्यावेळी पंतप्रधान म्हणून अनेक आघाड्यांवर संघर्ष करत होते. देशातील ५०० पेक्षा जास्त संस्थाने विलिन करून घ्यायची होती, त्यामुळे त्यांच्या कलाने घेतले जाण्याची गरज लक्षात घेऊन त्यावेळी निर्णय झाले. केंद्रीय गृहमंत्री असलेल्या शाह यांची अभ्यास करून व्यक्त होण्याची ख्याती नाही. तसेच त्यावेळच्या संघर्षात त्यांच्या विचारधारेचे लोक कुठेही नव्हते. त्यामुळे त्यांना या इतिहासाची माहिती असणेही शक्य नाही. यासाठीच त्यांनी अभ्यास करून नंतरच बोलावे अशी टीका छाजेड यांनी केली.