पुणे : मी नऊ वर्षांची असताना इरफान खान यांच्यासह 'राजकुमारी' नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले होते. वडील आणि मुलीच्या हळुवार नात्यावर बेतलेल्या लघुपटाचे चित्रीकरण पुण्यातच झाले होते. त्यावेळी इरफान सरांसमवेत निर्माण झालेले भावबंध आणि आठवणी अगदी काल-परवा घडल्यासारख्या ताज्या आहेत. त्यांच्या निधनाची बातमी आली आणि आठवणींचा पट डोळ्यांसमोर तरळून गेला. त्यांना 'थँक्स' म्हणायचे राहूनच गेले. आता सर कधीच भेटणार नाहीत, अशा भावना व्यक्त करताना ऐश्वर्या शिधये हिचा स्वर गहिवरला होता.
अभिनेत्री आणि सहायक दिगदर्शक म्हणून कार्यरत असलेल्या ऐश्वर्याला वयाच्या नवव्या वर्षीच इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. व्हिकटोरिया हारवूड यांच्या 'राजकुमारी' या लघुपटामध्ये २००५ साली इरफान खान यांनी वडिलांची तर ऐश्वर्याने मुलीची भूमिका साकारली होती. दोन-तीन दिवस डेक्कन, कात्रज उद्यान अशा विविध ठिकाणी शूटिंग झाले. घाबरलेल्या, भांबावलेल्या ऐश्वर्याला काम करणे सोपे जावे, यासाठी इरफान खान तिच्याएवढे झाले. तिच्याशी खूप गप्पा मारल्या, खूप शिकवले. व्हिकटोरिया यांच्याशी इंग्रजीमध्ये संवाद साधताना त्यांनी खूप मदत केली, अशा आठवणी तिने उलगडल्या.
ऐश्वर्या म्हणाली, 'एवढ्या मोठ्या अभिनेत्याबरोबर पूर्ण दोन दिवस मला काम करता आले. त्यांचा साधेपणा, आपल्याएवढे होऊन संवाद साधण्याची पद्धत आजही आठवते. जसजशी मोठी होत गेले, तशी मी इरफान सरांच्या अभिनयाचा अधिकाधिक अभ्यास केला आणि समृद्ध होत गेले. पुन्हा कधीतरी किमान एकदा तरी त्यांची भेट होईल आणि मी त्यांना 'थँक्स' म्हणेन अशी इच्छा होती. मात्र, आता ती कधीच पूर्ण होणार नाही. ते गेल्याचे ऐकले आणि खूप वाईट वाटले. आई-बाबांबरोबर पुन्हा एकदा ती शॉर्ट फिल्म पाहिली. माझ्या आयुष्यातील त्या खूप सुंदर आठवणी आहेत. मी इरफान खान यांना कायम मिस करेन.'