अवसरी : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील शेतकरी कुसुम हिंगे यांच्या शेतातून डिंभा उजव्या कालव्याची पोटचारी जात आहे त्यांचे ५० गुंठ्यांपैकी २ गुंठे क्षेत्र पोटचारीत जात असल्याचे जिल्हाधिकारी भूसंपादन विभागाने त्यांना तसे नोटीस दिले असताना तत्कालीन तलाठ्याने २५ गुंठे क्षेत्र संपादित केले आहे. अशाच घटना अनेक शेतकऱ्यांबद्दल झाल्या असल्यामुळे तलाठी कार्यालय व पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
याच गावातील जयसिंग चवरे, प्रताप हिंगे यांच्या क्षेत्रातून पोटचारी जात नसताना त्यांच्या ६५ गुंठ्यापैकी ५५ गुंठे क्षेत्र पोटचारी संपादित केल्याचा शेरा त्यांच्या ७/१२ उताऱ्यावर मारला आहे. वरील क्षेत्रावरील शेरा कमी करण्यासाठी तलाठी कार्यालय व पाटबंधारे विभागात हेलपाटे मारून अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने संबंधित शेतकरी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना लेखी पत्र व्यवहार करणार असल्याचे जयसिंग चवरे व कुसुम हिंगे यांनी सांगितले.
जयसिंग चवरे, प्रताप हिंगे व कुसुम हिंगे यांचे ६५ गुंठे सामाईक क्षेत्र आहे. त्यापैकी ५५ गुंठे क्षेत्र पोटचारीसाठी संपादित केले असल्याचे उताऱ्यावर दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात या क्षेत्रातून पोटचारी जात नाही, तसेच अवसरी बुद्रुक खालचा शिवार येथे किसन हिंगे, प्रताप हिंगे व कुसुम हिंगे यांचे सामाईक २२ गुंठे क्षेत्र असताना त्यांचे पोटचारीसाठी ३१ गुंठे क्षेत्र पोटचारीसाठी संपादित केले असल्यचे दाखविण्यात आले आहे. या क्षेत्रात ९ गुंठे क्षेत्र जादा आले कसे, याबाबत वरील सर्वांच्या ७/१२ व ८ उताऱ्यावर डिंभा उजव्या कालव्यासाठी क्षेत्र संपादित म्हणून तलाठी कार्यालय व पाटबंधारे विभागाने शिक्के मारल्याने जयसिंग चवरे व कुसुम हिंगे यांना जमीन विक्री किंवा वाटपपत्र करता येत नाही त्यामुळे तलाठी कार्यालयचा भोंगळ कारभार उघड झाला असून शेतकऱ्यांवर पश्चातापाची वेळ आली आहे. तत्कालीन तलाठ्याने जाणीवपूर्वक त्रास दिल्याच्या भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
डिंभा उजव्या कालव्याची पोटचारीसाठी पाटबंधारे विभागाने अवसरी बुद्रुक येथिल सर्रास शेतकऱ्यांच्या ७/१२ व ८ उताऱ्यावर संपादित क्षेत्र म्हणून शेरा मारला आहे. मात्र, प्रत्यक्षात ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र संपादित केले आहे त्यांना अद्याप आठ वर्षात मोबदला मिळाला नाही. कुसुम रत्नाकर हिंगे व जयसिंग चवरे हे तलाठी कार्यालयात शेरा कमी करण्यासाठी गेले असता त्यांना सांगण्यात आले की, तुम्ही पाटबंधारे विभागाकडून ताबापावती आणा त्यानंतर तुमचे क्षेत्र सुरळीत करण्यात येईल, असे तलाठ्याने सांगितले.
--
फोटो क्रमांक : २९ अवसरी पाटबंधारे विभाग
फोटो ओळी : अवसरी बुद्रुक (ता.आंबेगाव) येथिल कुसुम रत्नाकर हिंगे यांचे २ गुंठे क्षेत्र संपादित करत असल्याचे जिल्हाधिकारी भूसंपादन विभागाचा आदेश तसेच त्यांचे ७/१२ व ८ उताऱ्यावरील कमी क्षेत्र दाखविल्याचे उतारे.