पुणे: व्हाइस लेयर ॲनालिसिस आणि सायकॉलॉजिकल चाचणीसाठी मान्यतेची गरज नाही. केवळ पॉलिग्राफ आणि लाय डिटेक्टर चाचण्यांनाच मान्यतेची गरज लागते. यात आरोपीविरुद्ध कोणत्याही गोष्टींचा वापर केला जाणार नाही. तोे केवळ काय दडवतोय अन् घाबरतोय का? हे कळणार आहे. त्यामुळे व्हाईस लेयर आणि सायकॉलॉजिकल चाचणी का आवश्यक आहे याचे लेखी स्पष्टीकरण सरकारी वकिलांनी न्यायालयात शुक्रवारी सादर केले. या केसची पुढील सुनावणी दि. २ ऑगस्टला होणार आहे.
दरम्यान, डॉ. प्रदीप कुरुलकर याची पॉलिग्राफ चाचणी आणि व्हाइस लेयर अँनालिसिस चाचणी करण्यास परवानगी देण्याची मागणी पुणे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात केली होती. त्यासाठीचा अर्ज एटीएसने न्यायालयाला सादर केला होता. विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी कुरुलकरच्या या चाचण्या करण्याची मागणी केली. मात्र, एटीएसने मागणी केलेल्या ’पॉलिग्राफ आणि व्हाइस लेयर’ चाचण्याला कुरुलकरचा नकार आहे. या चाचण्यांसाठी त्याची परवानगी गरजेची आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षाने न्यायालयात केला होता.
यावर न्यायालयाने एटीएसच्या अधिकाऱ्यांना व्हाइस लेयर अँनालिसिस चाचणी म्हणजे काय आणि ती कशासाठी केली जाते, यापूर्वी ही चाचणी कोणाची झाली आहे का?, अशी विचारणा केली होती. मात्र, एटीएसच्या अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती देता आली नाही. त्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी चाचणीबाबत सुनावणी घेण्यापूर्वी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले. त्यानुसार सरकारी वकील फरगडे यांनी न्यायालयात व्हाइस लेयर अँनालिसिस आणि सायकॉलॉजिकल चाचणी करणे का आवश्यक आहे याबाबत लेखी स्पष्टीकरण सादर केले आहे.
कुरुलकर हा तपास अधिकाऱ्यांपासून खूप काही माहिती लपवीत आहे. कोणती माहिती लपवत आहे ते जाणून घेणे आवश्यक आहे. व्हाइस लेअर चाचणीत केवळ तो काय दडवतोय, तो घाबरतोय का? हे कळेल. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे एक सायटेशनही सरकारी वकिलांनी सादर केले. दरम्यान, कुरुलकर याच्याविरोधात न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रातील गोपनीय साक्षीदारांची माहिती मिळावी, असा अर्ज बचाव पक्षाने न्यायालयात सादर केला आहे.