बारामती : लहान शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील प्राथमिक शिक्षक २ ऑक्टोंबर रोजी आक्रोश मोर्चाच्या रूपाने रस्त्यावर उतरणार आहेत. तसेच या निर्णयाविरोधा अभिनव पध्दतीने निषेध नोंदविणार आहेत.अस्वस्थ शिक्षक आणि हरवलेले शिक्षण, शिक्षण विभागाचे डोके ठिकाणावर आहे काय?आदी विषयांवर शिक्षकांची निबंध स्पर्धा होणार आहे. राज्यातील शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केल्याची माहिती शिक्षक संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली आहे
२ ऑक्टोबरच्या आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पुणे शाखेच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.राज्यस्तरीय निबंध स्पर्धा महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी खुली आहे. शिक्षकांनी अभ्यासपूर्ण लेख पाठवावेत. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी ३१ हजार रुपये सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र तसेच तृतीय क्रमांक साठी ११ हजार रुपये, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांच्या लेखांना नामांकित वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी दिली जाणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी सर्व शिक्षकांना ऑनलाइन प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सहभागी शिक्षकांनी ३० सप्टेंबर पर्यंत आपले लेख ९५१८३६५६१५ व ८४८२९३९३२७ या क्रमांकावर पीडीएफ स्वरूपात पाठवावेत ,असे आवाहन शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.
या निबंध स्पर्धेमधील विषय पुढीलप्रमाणे
अस्वस्थ शिक्षक आणि हरवलेले शिक्षण, शिक्षण विभागाचे डोके ठिकाणावर आहे काय?, मागील १०० दिवसांमधील अशैक्षणिक कामाची दैनंदिनी,सरकारी शाळांमधील खाजगीकरण आणि उद्याचा महाराष्ट्र,समूहशाळा संकल्पना वाडी वस्तीवरील शिक्षणासाठी पूरक की मारक ?.