पुणे : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ ला एका विमान अपघातात झाला, असे सांगितले जाते; मात्र हा इतिहास खरा आहे का, भारतीय स्वातंत्र्यामध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचे नव्हते म्हणून त्यांना मृत घोषित केले का? त्यांच्या जगण्यावर किंवा मरणावर राजकारण करायचे होते का, विविध प्रश्नांची उत्तरे आता पुणेकरांना मिळणार आहे. कारण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर वीस वर्षांहून अधिक काळ संशोधन करणारे अनुज धर आणि चंद्रचूड घोष हे दोघेही एकाच मंचावरून काही कागदपत्रांच्या आधारे नेताजींचा जीवनप्रवास आणि मृत्यूचे गूढ उकलणार आहेत.
येत्या रविवारी (दि. २६) रात्री ९ वाजता अण्णाभाऊ साठे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमेश गोसावी, आशुतोष नर्लेकर आणि संजय गोसावी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अनुज धर आणि चंद्रचूड घोष यांनी नेताजी याच विषयावर आतापर्यंत विपुल लेखन केले आहे. त्यांनी अनेक वर्षे केलेल्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढला आहे की, नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ ला झाला नव्हता. त्यानंतर ते अनेक वर्षे जिवंत होते. या संदर्भातील संशोधन सुरू केल्यानंतर नेताजींच्या स्वातंत्र्यापूर्वीचे आणि स्वातंत्र्यानंतरचे अशी दोन वेगळी आयुष्ये होती. त्यातील समान धागे शोधण्याचा प्रयत्न धर आणि घोष या जोडीने केला असून, त्यांच्या संशोधनाचा हा चित्तथरारक प्रवास ते पुणेकरांसमोर मांडणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे पुणेकरांना नेताजींचा मृत्यू सरकारने दिलेल्या तारखेलाच झाला का, नेताजी १९८५ पर्यंत भारतातील उत्तर प्रदेशमध्ये राहत होते का, नेताजी स्वातंत्र्यानंतरही जिवंत होते का, ते जिवंत होते तर सरकारने ते कधी मान्य का केले नाही, अशा विविध प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.