Corona New Variant: कोरोनाचा नवा व्हेरिअंट चिंताजनक आहे का? काय म्हणाले अजित पवार...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 01:17 PM2022-05-29T13:17:07+5:302022-05-29T13:25:22+5:30
कोरोनाचा नवा व्हेरिएंटचे पुण्यात रुग्ण आढळून आले आहेत
बारामती : काही बातम्या अफवा असतात. तर काहींमध्ये तथ्य असते. कोरोनाचा नवा व्हेरिअंट चिंता करण्यासारखा असेल तर त्याची माहिती आम्ही जनतेला देऊ. त्यामुळे उद्या मुंबई येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून या व्हेरिअंटबाबत नागरिकांनी काय काळजी घ्यायची याबाबत सुचना देण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामती येथे विविध विकासकामांच्या दौऱ्यानिमित्त रविवारी (दि. २९) उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार पुढे म्हणाले, कोरोनाचा नवा व्हेरिएंटचे पुण्यात रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांना चौकशी करायला सांगितली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील याबद्दल माहिती घेत आहेत. सोमवारी या प्रकाराबद्दल माहिती घेतली जाईल. सगळ्या जनतेच्या दृष्टीने गंभीर बाब असेल तर जनतेला पण त्याच्या बद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि काय काळजी घेतली पाहिजे खबरदारी घेतली पाहिजे. त्याबद्दल देखील माहिती दिली जाईल.
मुंबई महानगर पालिकेत झालेल्या कथित घोटाळ्यांच्या आरोपांबाबत बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, असे आरोप नेहमी होत असतात. मात्र आरोप करणाऱ्याने त्याबाबत काही पुरावे दिले. घोटाळा झालेला निष्पन्न न होता, ज्या आरोपांमध्ये तथ्यनाही अशा आरोपांची दखल घेतली जात नाही. तसेच नवाब मलिकांचा राष्ट्रवादीला विसर पडला या विरोधकांच्या आरोपांबाबत विचारले असता आम्हाला कोणाचाही विसर पडत नाही. जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी आम्ही त्यांची घेत आहोत, असे आजित पवार यांनी उत्तर दिले.