पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात गांजा सापडल्याचा आराेप विद्यार्थी संघटनेने केला आहे. या घटनेला दाेन आठवड्यांचा कालावधी हाेऊनही विद्यापीठ प्रशासनाने पाेलिसांत गुन्हा दाखल केला नाही. विद्यापीठ प्रशासन हे प्रकरण का दाबत आहे? असा सवाल उपस्थित करून संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार रविंद्र धंगेकर यांनी केली. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित हाेते.
विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात गांजा आढळून आल्याचा प्रकार दि. १४ मे राेजी उघडकीस आला हाेता. मात्र, त्या विराेधात विद्यापीठ प्रशासनाकडून काेणतेही पावले उचलले नाहीत. विद्यापीठाकडून कारवाई हाेत नसल्याने आमदार धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी मंगळवारी (दि. २८) कुलगुरू डाॅ. सुरेश गाेसावी यांची भेट घेतली. यावेळी प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरे उपस्थित हाेते. गांजा प्रकरणात गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन कुलगुरूंना देण्यात आले. यासंदर्भात कुलगुरूंशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
विद्यापीठात अनेक वादग्रस्त घटना घडत आहेत. भ्रष्टाचार, पुराेगामी संघटनांवर खाेट्या केसेस दाखल करणे, मुलींना मारहाण हाेणे, गांजा सापडला त्याची चाैकशी केली जात नाही. अद्याप गुन्हा दाखल झालेला नसेल, तर कुलगुरू काेणाला पाठीशी घालत आहेत? कुलगुरूंना मंगळवारी आम्ही मवाळ पध्दतीने विनंती केली आहे. - रविंद्र धंगेकर, आमदार
गांजा प्रकरणात गुन्हा दाखल हाेईल असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. हे प्रकरण लपविण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले असतील त्यांच्यावर निलंबन करावे आणि चाैकशी करावी. असे हाेत नसेल तर अधिवेशनात चर्चा घडवून आणावी लागेल. - सुषमा अंधारे, उपनेत्या, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट)