आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत महिला पोलीसाने इंद्रायणीनदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज (दि. २९) आणखी एका वीस ते पंचवीस वर्षीय महिलेने इंद्रायणीत उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेने आळंदी पोलीस व नगरपरिषद प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान संबंधित महिलेचा मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलाशेजारील नव्याने उभारण्यात आलेल्या स्कायवोक पुलावरून नदीपात्रात उडी मारली. दरम्यान आळंदी पोलीस, आळंदी अग्निशमन विभाग पथकाकडून इंद्रायणी नदीत संबंधित महिलेचा शोध सुरु आहे. सद्यस्थितीत इंद्रायणी नदीला पाण्याचा प्रवाह जास्त आहे. त्यामुळे नवीन पुलाच्या खालच्या बाजूला तसेच अन्य ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे. अद्याप आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव तसेच आत्महत्येचे कारण समजले नाही. आळंदी पोलीस घटनेचा तपास करत आहे.
रविवारी (दि. २५) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास एका महिलेने इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळील गरुड खांबावरून नदीत उडी मारली होती. त्यानंतर आळंदी पोलीस, आळंदी अग्निशमन विभाग, एनडीआरएफ यांच्या पथकाकडून इंद्रायणी नदीत शोधकार्य सुरु होते. अखेर बुधवारी (दि. २८) संबंधित पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगाव येथील नदीपात्रात आढळून आला आहे. अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या. सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे त्या नेमणुकीस होत्या. रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली. मात्र नदीत उडी मारण्यापूर्वी अनुष्का केदार यांनी देहूफाटा आळंदी येथे राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राला फोन केला होता. मी इंद्रायणी नदीत उडी मारणार असल्याचे त्यांनी फोनवर म्हटले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या मित्राला बोलावून घेत त्याची चौकशी सुरु केली.