पुणे: राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असून सर्वसामान्य जनता हतबल झाली आहे. काही राजकीय मंडळी गुंडांना भेटून त्यांचे सत्कार करतात. तर दुसर्या बाजूला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबाराची घटना घडते. त्या सर्व घडामोडी दरम्यान आता ड्रग्ज सापडत आहेत. अमली पदार्थांपासून तरुणांनी दूर राहिले पाहिजे. त्यामुळे राज्यात आज सरकार आहे की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच काही आमदार पोलिसांबाबत काहीही विधान करत आहेत. आम्हाला कोणी हात लावू शकत नाही. त्यामुळे हे सरकार बिल्डर, ठेकेदार की सर्व सामान्य नागरिकांचे सरकार आहे अशी टिका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते , माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्येकेली आहे.
यावेळी माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण , माजी आमदार माेहन जोशी उपस्थित होते. आदित्य ठाकरे म्हणाले, पुण्यातील रुबी हॉल पासून पुढे जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचे काम देखील पूर्ण झालेले आहे आणि विमानतळाच्या ट्रमिनअल दोनचे उदघाटन अदयाप ही होत नाही. विमानतळावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले नाही म्हणुन पाच महिने झाले विमानतळाचे उदघाटन झाले नाही. केवळ व्हीआयपींना वेळ नसल्याने अद्यापपर्यंत उद्घाटन झाले नाही. तसेच दुसर्या एका पुलाचे काम अर्धवट आहे. त्याचे उदघाटन करण्यास घटनाबाह्य मुख्यमंत्री आतुर असल्याचे दिसत आहे. आजपर्यंत अर्धवट पुलाच्या कामाचे उदघाटन कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केल्याचे आपण पाहिले आहे का? काल पोर्णिमा असल्याने त्यांना वेळ नव्हता. अमावस्या आणि पोर्णिमेला शेती करायला जातात. हे त्यांच्या आजवरच्या दौर्यांवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता तरी पुलाचे उद्घाटन करून नागरिकांची वाहतूक कोंडीमधून सुटका करा, अशी भूमिका मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी टीका केली.
भाजपाला लोकशाही नको
राज्यातील छोटे छोटे पक्ष संपवा असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपने लोकशाही संपवली आहेच. २०२२ मध्ये शिवसेना, २०२३ मध्ये राष्ट्रवादी फोडली आणि त्यांचा एक परिवार फोडला. तसेच आता २०२४ मध्ये काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच भाजपाला लोकशाही नको आहे आणि तुम्ही मला ज्या व्यक्ती बाबत प्रश्न विचारला, त्यांचा चायनाशी जवळचा संबध असल्याचे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. निवडणूक आयोगाच्या सूचना असतानाही आणि चार वर्षे पूर्ण झालेली असतानाही अनेक शहरांचे आयुक्त देखील बदलले नाहीत, या मागचं गौडबंगाल काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला
आम्ही महाराष्ट्रासाठी लढतोय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या सर्व मित्र पक्षांशी चर्चा सुरू आहे. जागा वाटपावर चर्चा सुरू असून पुढील काही दिवसात त्याचा निर्णय जाहीर होईल. आम्ही जागा वाटपात मध्ये कोणीही भांडत नाही. महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतली. आम्ही जागासाठी नव्हे महाराष्ट्रासाठी लढत आहे. भाजप आणि त्यांना साथ देणाऱ्या पक्षांना सत्तेतून खाली घेण्यासाठी आवश्यक ती रणनीती तयार केली जात असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.