लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आधुनिक युगात जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य समाजाने मान्य करणे आवश्यक आहे. मात्र सध्या आंतरधर्मीय विवाहाविरोधात काही राज्ये कायदे करत आहेत आणि इतर राज्यातील नेते मंडळी त्यावर कोणतेही मत व्यक्त करीत नाहीत. ही गंभीर गोष्ट आहे. महाराष्ट्रासारखे पुरोगामी राज्य ही याबाबत उदासीन आहे, अशी खंत ज्येष्ठ लेखक संजय पवार यांनी व्यक्त केली. खरंतर ‘इश्क तौफीक (सामर्थ्य) है गुनाह नही’ असे फिराक गोरखपुरी यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमात प्रेमातील सामर्थ्य काय ते अनुभवायला मिळाले.
एस. एम. जोशी फाउंडेशन येथे व्हॅलेंटाइन्स डे निमित्त आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह अथवा प्रेमविवाह केलेल्या व्यक्तींचा स्नेहमेळावा रविवारी (दि.१४) आयोजिला होता. भारतीय राज्यघटना, जोडीदार निवडीचे व्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवी हक्क या अनुषंगाने प्रबोधन आणि व्यापक मंच उभारणे हा मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. मेळाव्याची सुरुवात सर्वांनी केक कापून आणि एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन केली.
या मेळाव्यात सामाजिक कार्यकर्त्या विद्या कुलकर्णी, प्रा. विपुला अभ्यंकर, कामगार नेते अजित अभ्यंकर, जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे तसेच अॅड. विशाल जाधव, अनिल हवालदार, अॅड. मीना जाधव, आर्किटेक्ट तृप्ती अनिल हवालदार आदी उपस्थित होते.
संजय पवार म्हणाले, आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्न केलेल्या व्यक्तींना तुटपुंजी आर्थिक मदत न करता त्यांची निकडीची गरज म्हणून त्यांना म्हाडामध्ये व इतर योजनांमध्ये घरे दिली पाहिजेत. त्यांना शिक्षण, नोकरी, बँककर्जे यासाठी मदत दिली पाहिजे.
विद्या कुलकर्णी म्हणाल्या, आंतरजातीय आणि आंतरधर्मीय प्रेमविवाहाचे प्रमाण कमी असून, त्या तुलनेत अरेंज मॅरेजचे प्रमाण अधिक आहे. दोघांमध्ये प्रेमाचे नाते निर्माण तर होते, पण लग्नापर्यंत हे नाते पुढे न्यायचे का? ही गोष्ट त्यांच्यासाठी अडचण ठरते. कुटुंबाकडून कायद्याचा होणारा गैरवापर, जातपंचायतीचा हस्तक्षेप, सरकारी पातळीवर धोरण नसणे या गोष्टी देखील विरोधाला कारणीभूत आहेत.
विपुला अभ्यंकर यांनी ४३ वर्षांपूर्वी केलेल्या आंतरधर्मीय प्रेमविवाहाचा अनुभव सांगितला. मी जैन कुटुंबातून आलेले होते. कुटुंबाची काहीशी संकुचित विचारसरणी होती. मी कुटुंबाला सांगण्याचे धाडस करू शकले नाही असे त्या म्हणाल्या.
किरण मोघे यांनीही त्यांचा अनुभव कथन केला. माझ्या बहिणींनी स्वजातीत प्रेम विवाह केला. पण मी आंतरजातीय विवाह केला. तेव्हा सर्वांना धक्का बसला. मला विरोध होईल असं वाटलं नव्हतं पण नकळतपणे विरोध झाला. खरंतर हा जातीसमूहांचा विरोध असतो, तर तो विचारांचा विरोध असतो. एका टप्प्यावर तणाव असतो तो नात्यात येऊ नये याकरिता जोडप्यांना प्रयत्न करावा लागतो.
---------------------------------------------
आंतरजातीय-आंतरधर्मीय आणि प्रेम विवाह करणा-यांसाठी मदत म्हणून सपोर्ट ग्रुप तयार करण्यासाठी आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह अभ्यास अभ्यास मंचाची स्थापना केली आहे. हा सपोर्ट ग्रुप सुरुवातीला महाराष्ट्रात काम करेल. त्यानंतर भारतभर त्याचा विस्तार केला जाईल. त्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात एक समिती स्थापन करण्याचा विचार आहे.
-अॅड. विशाल जाधव, आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह अभ्यास अभ्यास मंच
----------------------------------------------------