श्रीकिशन काळे
पुणे: राज्य व केंद्र सरकारने सध्या शहराचे नाव बदलण्याचा सपाटा लावला आहे. परंतु, नाव बदलण्याची परंपरा शिवरायांच्या काळापासून असल्याची नोंद आहे. त्या काळात औरंगजेबाने रायगड किल्ला जिंकला तेव्हा त्याचे नाव इस्लामगड ठेवले होते. एखादा प्रांत जिंकल्यानंतर त्याचे नाव पूर्वी बदलण्याची प्रथा होती. आज मात्र केवळ राजकीय सोय आणि मतांसाठी नाव बदलले जात असल्याचे दिसून येत आहे.
देशातील आणि राज्यातील अनेक शहरांची नावे बदलण्यात आली. महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे केले आहे. त्यानंतर गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यादेवीनगर करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.
मुस्लिम राजवटीने जेव्हा मराठा साम्राज्यातील किल्ले जिंकले, तेव्हा त्याची नावे बदलली होती. स्वराज्याची राजधानी रायगडचे नाव देखील बदलले होते. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ही माहिती इतिहास लेखक प्रा. प्र. के. घाणेकर यांनी ‘लोकमत’ला दिली. ते म्हणाले,‘‘इतिकदकखानाने रायगड जिंकला होता. त्याचा औरंगजेबाने मोठा सन्मान केला. त्याला झुल्फिकारखान किताब दिला. रायगडाचे नवे नाव इस्लामगड असे ठेवले होते. हे सारे कागदोपत्री झाले. तरी तसा एक अधिकृत शिलालेख खुद्द रायगडावर बसवायचा हुकूम निघाला. या साऱ्या घटना १६८९-९० मधील आहेत. प्रत्यक्ष शिलालेख तयार व्हायला १६९५ साल उजाडले. मात्र तो रायगडावर बसवण्याच्या कामात बरीच चालढकल झालेली दिसते. कारण तो रायगडावर नेऊन बसवण्याचे काम कधी झालेच नाही.’’
शिलालेख गेला कुठे?
मी पाहिला तेव्हापासून पाचाडच्या कोटाच्या दर्शनी बुरूजावर शिलालेख होता. पुढे १९७४ नंतर पाचाड-रायगडाची साफसफाई, जीर्णोध्दार, दुरुस्त्या आदी सुरू झाल्यावर तो शिलालेख तेथून काढून ठेवला. तो सध्या नेमका कुठे आहे, याची कल्पना नाही. कदाचित केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाच्या शीव-मुंबई येथील कार्यालयाच्या संग्रहात हलविला गेला असावा, असे इतिहास लेखक प्रा. प्र. के. घाणेकर यांनी सांगितले.
''रायगडाचे पूर्वी तणस, रायरी असे अनेक नावे होती. त्यानंतर रायगड झाले. औरंगजेबाने किल्ला जिंकला तेव्हा इस्लामगड नाव दिले. त्यानंतर पुन्हा तो रायगड नावाने ओळखला जाऊ लागला. इंग्रजीत रायगडाच्या नावाचा योग्य उच्चार होत नाही. कोणीही त्याकडे लक्ष देत नाही. आता अहिल्यादेवीनगर नाव हे योग्य आहे का? ग्रंथपुराणात त्याचे नाव अहल्यादेवी आहे. नाव देताना तज्ज्ञांकडून तपासले पाहिजे. - प्रा. प्र. के. घाणेकर, इतिहास अभ्यासक''