पुणे : हडपसर परिसरात रविवारी (दि. ७) एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. महाराष्ट्रातील एका बड्या मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून या तरुणीने आत्महत्या केल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये सुरू आहे. या संदर्भात तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. या प्रकरणामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीकास्र सोडतानाच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील तापविण्यास सुरुवात केली आहे. अठ्ठेचाळीस तास उलटून देखील या प्रकरणी पोलिस कारवाई का करत नाहीत असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले. पाटील म्हणाले, पुण्यातल्या एका तरुणीने आत्महत्या केली आहे. तिच्या मोबाईलवरुन स्पष्ट होते आहे की तिचे राज्य सरकारमधील एका मंत्र्याशी प्रेमसंबंध होते. त्यात झालेल्या तणावातुनच तिने आत्महत्या केली. पण अठ्ठेचाळीस तास झाले तरी यात गुन्हा नोंदवला गेला नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की यात नातेवाईकांची तक्रार नाही. पण मग पोलीस सुमोटो पद्धतीने गुन्हा का दाखल करत नाही ? की राज्यात कायदा हा विषयच संपला आहे ?असा सवाल पाटील यांनी उपस्थित करतानाच तुम करे सो कायदा असेच सर्व चालले आहे ,अशी टीका पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे.
'त्या' तरुणीची आत्महत्या...फडणवीस म्हणाले... पुण्यातील पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली ही बातमी मी वाचली आहे. या प्रकरणात राज्य सरकारमधील एका मंत्र्याचा सहभाग असल्याची चर्चा आहे. हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. याची पोलिसांनी नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, अशी प्रतिक्रिया भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
रक्षकच महिलांसाठी बनले आहेत भक्षक; भाजपा आमदाराचा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे, भातखळकरांनी ट्विट करून म्हटलंय की, तसेच या राज्यात मंत्र्यांपासूनच महिला सुरक्षित नाहीत, कोणी बलात्काराची तक्रार करतंय, कोणी आपली मुलं पळवून नेली म्हणून तक्रार करतंय, आता मंत्र्यांच्या संबंधामुळे महिला आत्महत्या करू लागल्या आहेत, आणि दबावामुळे कोणी नातेवाईक पुढे येऊन तक्रार करत नाही, इतकी राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. रक्षकच महिलांसाठी भक्षक बनले आहेत असा आरोप करत तात्काळ निनावी एफआयआर दाखल करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.
भाजप महिला आघाडीची तक्रार.... महाराष्ट्रातील एका बड्या मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून या तरुणीने आत्महत्या केल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये सुरू आहे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. संबंधित बड्या मंत्र्याचा या तरुणीसोबत असलेला संबंध पोलिसांनी शोधून काढला पाहिजे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित दोषी गुन्हेगारांना अटक करावी, अशी मागणी या भाजपा महिला आघाडीने केली आहे. ही तक्रार दाखल केल्यानंतर पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना याबाबतचे निवेदनही दिले आहे. महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्ष अर्चना पाटील यांनी या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर न केल्यास तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.