पुणे: घरी जात असलेल्या एका सराफाच्या सहकाऱ्यावर चोरट्यांनी गोळीबार केला. वानवडी परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली. सुदैवाने यात सहकाऱ्याचे प्राण थोडक्यात वाचले असून, ही घटना इतरांसाठी एक इशारा तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. या पार्श्वभूमीवर सराफांनी दुकानातील दागिने, रोकड घरी घेऊन जाताना काळजी घ्यावी. तसेच ग्राहकांनीही यातून धडा घेणे गरजेचे आहे, असे पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. फत्तेचंद रांका यांनी सांगितले.
दुकान बंद करून घरी जात असताना बी.टी. कवडे रोडवर बुधवारी रात्री तिघा हल्लेखोरांनी प्रतीक मदनलाल ओसवाल हे वडिलांबरोबर दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी तिघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना जखमी केले. त्यांच्याकडील बॅग हिसकावून नेली. या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ उडाली.
याबाबत ॲड. फत्तेचंद रांका यांनी सांगितले की, बुधवारी रात्री घडलेल्या गाेळीबाराच्या घटनेची माहिती मिळाल्यावर आमच्या सर्व सदस्यांना असोसिएशनच्या वतीने सूचना दिल्या आहेत. सध्या गुन्हेगारी वाढली आहे. छोट्या- छोट्या कारणावरून गोळ्या झाडल्या जात आहेत. त्यामुळे आपल्या दुकानात कोण येते, आजूबाजूला कोण रेकी करते का, यावर लक्ष ठेवावे. सध्या सणाचे दिवस आहे. उलाढाल वाढलेली असते. अशा वेळी घरी जाताना पुरेशी सावधानता घेतली पाहिजे. दागिने, रोकड घेऊन रात्री एकटे जाऊ नका.
लक्ष्मी रोडवर १०० फुटांवर कॅमेरे बसवा
लक्ष्मी रोड ही शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ आहे. येथे सोन्या- चांदीच्या दुकानांबरोबर इतरही मोठी दुकाने आहेत. या ठिकाणच्या रोडवर दर १०० फुटांवर अत्याधुनिक सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी आम्ही व्यापाऱ्यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे केली आहे. त्यांनी तसे आदेश दिले असल्याचे ॲड. फत्तेचंद रांका यांनी सांगितले.
लक्ष्मी रोडवर अनेक सराफी पेढ्या आहेत. सध्या दिवाळी सणामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी असते. त्यामुळे पोलिसांचा या परिसरात रात्री उशिरापर्यंत बंदोबस्त असतो. असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. आपण स्वत: तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना पायी गस्त घालत असतो. - संदीपसिंग गिल, पोलिस उपायुक्त
पाळत ठेवून केली लूट
- प्रतीक ओसवाल या सराफावर गोळीबार करून दागिने व रोकड असलेली बॅग हिसकावून नेणाऱ्या हल्लेखोरांचा तपास सुरू असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. याबाबत मदनलाल जव्हेरचंद ओसवाल (वय ७१, रा. घोरपडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
- फिर्यादी यांचे हडपसर येथील सय्यदनगरमध्ये नाकोडा गोल्ड ॲड सिल्व्हर ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. फिर्यादी व त्यांचा मुलगा प्रतीक ओसवाल यांनी बुधवारी रात्री नऊ वाजता दुकान बंद केले. दिवसभरातील विक्रीचे १० हजार रुपये आणि दुरुस्तीसाठी आलेले दाेन तोळ्यांचे दागिने एका बॅगमध्ये घेऊन ते दुचाकीवरून जात होते. बी.टी. कवडे रोडवरील जयसिंग ससाणे उद्यानाजवळ ते आले असताना दुचाकीवरून तिघे जण तिथे आले. त्यांनी प्रतीक यांच्या गाडीला दुचाकी आडवी घातली. त्यांच्यातील एक जण खाली उतरला. त्याने प्रतीक यांना तू कशी गाडी चालवितो, असे म्हणून त्यांच्याकडील बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. प्रतीक यांनी विरोध केल्यावर दुसऱ्याने खाली उतरून त्याच्याकडील पिस्तूलातून एकापाठोपाठ सहा गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या मुलाच्या गालात, पायाच्या मांडीत, पोटरीवर लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यातील एकाने प्रतीक यांच्याकडील बॅग हिसकावून घेऊन ते पळून गेले. त्यानंतर फिर्यादी यांनी प्रतीक यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.
गाेळीबाराची घटना पाहता हल्लेखोरांनी पाळत ठेवून हा हल्ला केला असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी सर्व बाजूने तपास सुरू केला आहे. - विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त