पुणे : “इस्राइलसारख्या भौगोलिकदृष्ट्या अत्यंत छोट्या देशाची राष्ट्रभक्ती वाखाणण्यासारखी आहे. इस्राइलवर आजूबाजूच्या अरब देशांनी वारंवार हल्ले केले. मात्र, प्रत्येक वेळी इस्राइलने ते हाणून पाडले. कारण तेथील लोकांच्या मनात असलेली राष्ट्रभक्ती आहे,” असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी शुक्रवारी (दि. २८) केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, युवाविवेक आणि राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आयोजित ‘इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष आणि राष्ट्रवाद’ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. सावरकर अध्यासन केंद्राचे प्रमुख, माजी खासदार प्रदीप रावत, कार्यवाह महेश पोहनेरकर, विवेक विचार मंचचे राज्य समन्वयक सागर शिंदे आणि राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पवळे उपस्थित होते.
देवधर म्हणाले की इस्रायलच्या स्थापनेपूर्वीपासूनच ज्यू आणि अरबांमध्ये सातत्याने संघर्ष सुरू आहे. अरब देशांनी इस्राइलवर हल्ले केल्याच्या अनेक घटना इतिहासात आढळतात. मात्र, इस्राइलने प्रत्येक वेळी आक्रमण परतवून लावले आणि अरब देशांचा पराभव केला. १९७२ मध्ये म्युनिक येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये दहशतवादी संघटनांनी इस्राइलच्या ११ खेळाडूंना ठार मारले. याचा बदला इस्राइलने अत्यंत नियोजनपूर्वक घेतला. पुढील २० वर्षांत त्या हल्ल्याशी निगडित प्रत्येक व्यक्तीला ठार करून घेतला. इस्राइलच्या एकूण लोकसंख्येपैकी तीन-चतुर्थांश लोक लष्करात असून, तेथे प्रत्येकाला लष्करी शिक्षण अनिवार्य आहे.”
इस्राइल आणि पॅलेस्टाइनच्या संघर्षामागे इस्लामी दहशतवाद असून, त्याचा धोका भारतालादेखील असल्याचे देवधर म्हणाले. त्यांनी सांगितले, “इस्रायल अजिंक्य राहिल्याने त्या विरोधात जशी दहशतवादाची खेळी केली गेली. तशीच अवस्था आता भारताबाबत आहे. प्राध्यापक, शिक्षक, राजकीय तज्ज्ञ, पत्रकार यांची माथी भडकवली जात असून, ते देशविरोधी भूमिका घेत आहेत.” संपूर्ण व्याख्यान आयोजक संस्थांच्या ‘फेसबुक पेज’वर उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.