पुणे : गुन्हे शाखा आणि पोलीस ठाणे स्तरावर उघडकीस आलेल्या घरफोडी, सोनसाखळी चोरी, चोरी आदी गुन्ह्यांमधील हस्तगत करण्यात आलेला तब्बल २ कोटी रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना समारंभपूर्वक देण्यात येणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालू वर्षातील उघड गुन्ह्यांमधील मुद्देमाल परत मिळवण्यासाठी फिर्यादींनी न्यायालयाची परवानगी घेतली आहे. ज्या फिर्यादींचा मुद्देमाल परत देण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे, अशा १०० फिर्यादींना हा मुद्देमाल विशेष कार्यक्रमात सुपूर्द करण्यात येणार आहे.गेल्या काही वर्षांत शहरातील घरफोड्या, सोनसाखळी चोऱ्यांसारखे मौल्यवान ऐवज चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस त्यांच्या परीने गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न करीत असतात. परंतु आपल्याला आपला चोरीला गेलेला ऐवज परत मिळेल, अशी आशाच फिर्यादींनी सोडलेली असते. परंतु नागरिकांमध्ये पोलीस आपला ऐवज परत मिळवून देऊ शकतात, असा विश्वास यानिमित्ताने निर्माण होईल, अशी आशा आयुक्त माथूर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
फिर्यादींना देणार २ कोटींचा मुद्देमाल
By admin | Published: August 28, 2014 4:23 AM