डिंभे : डिंभे धरणाचे पाणी विनासायास इतर तालुक्यांना मिळते. परंतु, वर्षानुवर्षे या भागातील भूमिपुत्रांना पाण्यापासून वंचित ठेवले जाते. ‘आता नाही तर कधीच नाही’ असे जाहीर आवाहन करून डिंभे धरणाच्या पाण्यासाठी तीव्र आंदोलन उभे करण्याचा पवित्रा डिंभे धरण प्रकल्पग्रस्तांनी घेतला. यामुळे डिंभे धरणाच्या पाण्याचा वाद पेटण्याची शक्यता आहे.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागाला डिंभे धरणाचे पाणी मिळावे, या मागणीसाठी रविवारी भीमाशंकर येथील कळमजाई मंदिरात बैठक पार पडली. या बैठकीसाठी तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व २५ गावांतील आदिवासी शेतकरी उपस्थित होते. यावेळी डिंभे धरणाच्या पाण्याच्या वाटपाबाबत या गावातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पाणीप्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी या बैठकीत कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. आदिवासी भागातील पाणीप्रश्नावर या वेळी पहिल्यांदाच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांत एकवाक्यता आसल्याचे पाहावयास मिळाले.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील आंबेगाव, मेघोली, दिगद, सावरली, वचपे, बोरघर, जांभोरी, आमडे, पोखरी, डिंभे बुद्रुक, फलोदे, साकेरी, नानवडे, पंचाळेखुर्द, कळंबई, फुलवडे, माळीण, अडिवरे, असाणे, कोकणेवाडी, कोलतावडे, बेंढारवाडी, पाटण, महाळुंगे, कुशिरे बुद्रुक, कुशिरे खुर्द साकेरी, पिंपरी इत्यादी गावे पूर्णत: व अंशत: बाधित होऊन शेतजमिनी धरणाच्या पाण्याखाली गेल्याने हजारो कुटुंबे कायमची निराधार झाली आहेत. ज्या-ज्या वेळेस सिंचनाच्या मागणीसाठी शेतकºयांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केले, त्या-त्या वेळेस प्रशासनाकडून या भागात छोटे मोठे बंधारे बांधू, खडकातील टाक्या काढू, तळ्यांचे प्रस्ताव तयार करून पाणीप्रश्न सोडवता येईल का? यावर शेतकºयांचे लक्ष वेधून मुख्य प्रश्नाला बगल देण्याचे काम केले आहे. बुडीत क्षेत्रातील काही गावे अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक शेतकºयांना लाभक्षेत्रात जमिनी मिळाल्या नाहीत. ज्यांना जमिनी मिळाल्या त्यांना ताब्यासाठी झगडावे लागत आहे. वर्षानुवर्षे मागणी करूनही या भागातील भूमिपुत्रांना डिंभे धरणाच्या पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याने तालुक्याच्या आदिवासी भागातील शेतकºयांच्या मनामध्ये तीव्र नाराजी असल्याचे बैठकीत पाहावयास मिळाले.
बैठकीदरम्यान या भागाला सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्याची एक योजना उपस्थितांसमोर मांडण्यात आली. मृतसाठा व पाणीवाटप वजा जाता येडगाव फिडिंगसाठी जाणा-या साठ्यापैकी ०.८० टीएमसी पाणी प्रकल्पग्रस्तांच्या शेतीला मिळावे, अशी मागणी अहवालात करण्यात आली आहे. कोलतावडे गावच्या सागाचीवाडी येथून पाणी उचलून मुख्य पाईप लाईनद्वारे हे पाणी पोखरी गावाजवळील वाघोबाच्या डोंगरावर पाच एकर मध्ये मुख्य तळे तयार करून हे पाणी त्यात सोडावे. पुढे गोहे खुर्द, गोहे बुद्रुक, राजेवाडी, पोखरी, चिखली, नांदुरकीचीवाडी, तळेघर,जांभोरी, फळोदे, राजपूर व तेरूंगण येथे गावतळ्यांत हे पाणी सोडावे. पुढील पाणीवाटप हे प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीने आपआपली यंत्रणा राबवून शेतकºयांच्या शेतापर्यंत देण्याची व्यवस्था करावायाची आहे. असे या योजनेचे प्राथमिक स्वरूप तयार करण्यात आले आहे. योजनचा प्रारूप अराखडा तयार करण्यासाठी मायक्रॉक्स इंजिनिअर्स मुंबई या संस्थेचे सहकार्य लाभले आहे.
या वेळी पुणे जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती व आदिवासी भागाचे नेते सुभाष मोरमारे, आंबेगाव पंचायत समितीउपसभापती नंदकुमार सोनावले,माजी जि.प.सदस्य विजय आढारी, जि.प.सदस्या रूपाली जगदाळे, इंदूबाई लोहकरे, पं.स.सदस्य संजय गवारी, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष मारूती लोहकरे, भाजपाचे मारूती भवारी,मोहन नंदकर, मारूती केंगले, अवजड वहातुक सेना उपाध्यक्ष दीपक घोलप, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी.बी.घोडे, सलीम तांबोळी. अनेक गावचे सरपंच व तालुक्याच्या पश्चिम भागातील सुमारे २५ गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.