पळसदेव : उजनी धरणातील पाण्याचे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दिवसेंदिवस उजनीचे पाणी कमी होत असले, तरी या पाण्यावर हिरवा व निळा रंग दिसत आहे. त्यामुळेच उजनी च्या जलप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.उजनी धरण हे तीन जिल्ह्यांतील इंदापूर, कर्जत, दौंड, करमाळा या तालुक्यांतील लोकांची जीवनदायनी आहे. उजनीवर शेतीसह पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.
इंदापूर तालुक्यात पाऊस झालाच नाही; मात्र पुणे शहर व परिसरात पाऊस झाल्याने उजनी धरणात पाणी आले. परिणामी, धरणशंभर टक्के भरले; परंतु उजनीचे पाणी दररोज कमी होत आहे. त्यामुळेच उजनीच्या जलप्रदूषणाचा अंदाज येण्यास सुरुवात झाली आहे.सध्या या पाण्याचा रंग निळा व हिरवा दिसत आहे. उजनीच्या जलप्रदूषणाचा विषय सोलापूर विद्यापीठात चर्चिला गेला आहे. येथील प्राध्यापकांनी उजनीचे पाणी पिण्यासाठी सोडाच, तर हात धुण्यासाठीसुद्धा योग्य नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे उजनीलगत असणाऱ्या गावांमध्ये जलप्रदूषणची चर्चा सुरू झाली आहे.४या पाण्यामध्ये रिजॉल, आॅक्सिजन, नायट्रोजन असल्याने कॅन्सर होण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून उजनीचे जलप्रदूषण गाजत आहे; मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाही. उजनीच्या जलप्रदूषणाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा घेण्यात आलेली आहे.४काही वर्षांपूर्वी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह व बाहेरच्या देशातील जलतज्ज्ञांनी कुंभारगाव येथे येऊन उजनीच्या पाण्याची पाहणी करून पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्या वेळी या जलतज्ज्ञांनी हे पाणी पिण्यास तर सोडाच, पण ते हात धुण्यासाठीसुद्धा योग्य नसल्याचा निष्कर्ष काढला; परंतु शासकीय पातळीवर हे जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही.४उजनी लगतच्या गावातील लोक हेच पाणी पितात. या गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रे बसविण्यात आले आहेत. तरीसुद्धा अनेक लोक हे पाणी पितात.