पुणे : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेच्या मुख्य सभा प्रत्यक्ष घेण्यास राज्य सरकारने अजून परवानगी दिलेली नाही. शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक धोरणात्मक निर्णय प्रलंबित असल्याने सत्ताधारी भाजपने सोमवारी (दि. ८) खास सभा आयोजित केली आहे. ऑनलाईन सर्वसाधारण सभेसाठीचे नियोजन महापालिकेने केले आहे.
या सभेत गेल्या ८ महिन्यांपासून रखडलेले महत्त्वाचे विषय घेण्यात येणार आहेत. गेल्या काही महिन्यांच्या कार्यपत्रिका एकत्र करण्यात आल्या असून, ही ऑनलाईन सभा ८ फेब्रुवारीपासून पुढे तीन दिवस घेण्याचा निर्णय झाला. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाइन सर्वसाधारण सभा होत आहे
या सभेसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात मोठे टीव्ही बसविण्यात आले आहेत. महापालिकेत पदाधिकारी आणि महापौर कार्यालयात ऑनलाइन सभेची यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे. क्षेत्रीय कार्यालयांमधील नगरसेवकांचे नियोजन क्षेत्रीय आयुक्तांकडे देण्यात आले आहे. ऑनलाइन सभेत मतदानाची व्यवस्था असेल.
कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी मात्र ऑनलाइन सभा घेण्यामागचे भाजपचे गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. कोणत्याही विरोधी पक्षाला विश्वासात न घेता ऑनलाइन सभेचा निर्णय घेतला असल्याचे सांगत त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.